मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळासाठी वातावरण तापलं होतं. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी यावर व्यक्त होताना आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही असं म्हटलं आहे.
अमोल मिटकरी अकोला शहरातील विश्रामगृहात आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसैनिकांची बाचाबाची झाली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. गाडीच्या तोडफोड प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. माझं वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. आपण कायदेशीरपणे कारवाई करु, असं अमोल मिटकरी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.
नेमका वाद काय?
राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना लक्ष्य केले होते. पुण्यातील मुसळधार पावसाचा विषय निघाला तेव्हा राज ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली होती. अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा केला होता. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. हे सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही.
राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.