बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीने तातडीचे आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारे उपाययोजना करण्यात याव्यात. तातडीच्या उपायांमध्ये गावे व शहरांजवळील बिबट्यांना शोधून पकडण्यात यावेत. यासाठी ड्रोनची मदत घ्यावी. पिंजरे, वाहने, मनुष्यबळ आदी बिबटे पकडण्यासाठी आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावेत. तसेच दीर्घकालीन उपाययोजनेत बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी. तसेच पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात दोन रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने जागा शोधून आराखडे तयार करावेत. तसेच गोरेवाडा सह इतर ठिकाणी सध्या असलेल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढविण्यात यावी.
बिबट्यांचा समावेश शेड्यूल एक मध्ये आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना पकडणे, त्यांना मारणे यावर मर्यादा येतात. त्यामुळे बिबट्यांना शेड्यूल एकमधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी केंद्र शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बिबट्यांची समस्या वाढल्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाल्याचे सांगितले. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गाव व शहराजवळ फिरणाऱ्या बिबट्यांना ड्रोनच्या सहाय्याने शोधून त्यांना पकडण्यात यावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने वाढविण्यात यावे. नागरी वस्तीत बिबटे आल्यास तो नरभक्षक समजूनच त्याला पकडण्यात यावे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागात रेस्क्यू टीम व वाहनांची संख्याही वाढवावी. सध्या असलेल्या माणिकडोह व इतर ठिकाणच्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, बिबट्यांच्या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात याव्यात. बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी पोलीस व वन विभागाने गस्त वाढवावी. तसेच बिबट्यांचा वावर असलेल्या पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील भागांमध्ये शाळांची वेळ सकाळी 9.30 ते 4.00 अशी करण्यात यावी. रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने निधीचा प्रस्ताव देण्यात यावे.
जंगलामधील भक्ष्य कमी झाल्यामुळे बिबटे हे मानवी वस्तीत येऊन हल्ले करत आहेत. त्यामुळे जंगलामध्येच त्यांना भक्ष्य मिळण्यासाठी बिबट्यांची संख्या जास्त असलेल्या जंगलात शेळ्या सोडण्यात यावेत. जेणेकरून ते मानवी वस्तीत येणार नाहीत. तसेच बिबट्यांना पकडण्यासाठी पुणे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 1200 पिंजरे पुरविण्यात येत आहेत, अशी माहिती वन मंत्री नाईक यांनी यावेळी दिली. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, दौंडचे आमदार राहूल कुल, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, श्रीरामनगरचे आमदार लहू कानडे त्यांच्या भागातील समस्या सांगून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.






