
अमरावतीत जलसंवर्धनाचा 'मास्टर प्लॅन'! पुनर्भरणासाठी अडीच कोटींचा आराखडा; अमृत योजनेतून ५० लाख निधी मंजूर
Amravati News: अमरावती जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अमरावती महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पावसाचे पाणी वाया जाण्यापासून रोखून त्याचे जमिनीत पुनर्भरण करणे, सार्वजनिक विहिरींची पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि भूजल पातळी उंचावणे, या उद्देशाने महापालिकेने अडीच कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी जलसंवर्धन आराखडा तयार केला आहे.(फोटो सौजन्य – AI)
उपक्रमासाठी आयआयटी रुडकी या नामांकित संस्थेचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार असून, केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून ५० लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. सध्या शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती नियंत्रणात असली, तरी भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने जलसंवर्धनावर भर दिला आहे. उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर आणि भूजल पातळीत वाढ करण्यासाठी प्रभागनिहाय उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
महापालिका क्षेत्रात सध्या २१४ सार्वजनिक विहिरी, ४ हजार ६० हातपंप आणि ५९० विद्युत हातपंप आहेत. यापैकी प्रत्येक प्रभागातील किमान दोन सार्वजनिक विहिरींचा गाळ काढून त्यांचे पुनर्भरण केले जाणार आहे. त्यामुळे या विहिरींची पाणी साठवण क्षमता वाढण्यासोबतच त्या पुन्हा सार्वजनिक वापरासाठी सक्षम होण्यास मदत होणार आहे. या कामासाठी झोननिहाय प्रत्येकी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
संबंधित संस्थांना लवकरच कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. या कामांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. दुसरीकडे, शहरातील ११ खुली मैदाने आणि उद्यानांमधील मोकळ्या जागांवर शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारली जाणार आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी या यंत्रणेद्वारे जमिनीत मुरवून भूजलसाठ्यात वाढ करण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेची उभारणी प्रभावी आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी आयआयटी रुडकीचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
पावसाचे पाणी अडविणे, जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भविष्यातील पाणीटंचाईचा धोका कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहराच्या भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठीही मदत होऊ शकते.
शहरातील पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत जिरविणे, सार्वजनिक विहिरींचे पुनर्भरण करणे आणि उपलब्ध जलस्त्रोत पुन्हा वापरायोग्य बनविणे, यावर महापालिकेचा विशेष भर आहे. या माध्यमातून भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.यासंदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता-२ सुहास चव्हाण यांनी माहिती दिली.