साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा
Amravati News: शेअर बाजारात गुंतवणूक करून कमी कालावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगांनी अमरावतीकरां ना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. २०२३ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंत शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली झालेली फसवणूक ९ कोटी ३२ लाख रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, २०२६ च्या पहिल्या ९ महिन्यांत शहरात सायबर फसवणुकीचे ३२ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये नागरिकांचे ३ कोटी ५३ लाख ४६ हजार ९०३ रुपये लुटण्यात आले आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी यापैकी १ कोटी १९ लाख ७० हजार ९२९ रुपये गोठवून संभाव्य नुकसान कमी करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती सायबर विभागप्रमुख सतीश पाटील यांनी दिली.(फोटो सौजन्य – istock)
चालू वर्षात सायबर फसवणुकीच्या ३२ गुन्ह्यांसोबतच अश्लील साहित्याशी संबंधित ३. तर समाजमाध्यमांशी संबंधित ३ गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरासह ग्रामीण भागात डिजीटल अरेस्ट आणि ऑनलाइन सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त अधिकाऱ्यांना लक्ष्य करून लाखो रुपयांची लूट केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये शंकरनगर येथील निवृत्त बँक व्यवस्थापकाला आधार कार्डचा दहशतवादी कारवायांमध्ये गैरवापर झाल्याची खोटी भीती व्हिडीओ कॉलद्वारे दाखवून ८० लाख ८० हजार रुपयांना फसविण्यात आले. अमरावती सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासातून ४० लाख रुपये गोठवून परत मिळवून दिले. ऑगस्टमध्ये वृद्ध दाम्पत्याला मनी लॉड्रिंगच्या खोट्या आरोपाखाली डिजीटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न झाला; मात्र जावयाच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली. यापूर्वी एका निवृत्त न्यायाधीशांची ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली होती.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२३ पासून या प्रकारात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.सायबर ठग फसवणुकीतून मिळालेली रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न ठेवता दुसऱ्यांच्या बैंक खात्यांमधून फिरवतात. यासाठी खातेदारांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती वापरली जातात. अशा खात्यांमुळे फसवणुकीतील पैशांचा माग काढणे कठीण होऊ शकते. या प्रकाराशी संबंधित ३ गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.






