
भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले
अमरावती : अमरावती महापालिकेच्या महापौर आरक्षणपूर्वी शहराचे राजकारण तापले आहे. अमरावतीचा १७ वा महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सर्व पक्षांनी ‘वेट अँड वॉच’ अशीच भूमिका घेतली आहे. मात्र भाजपचे मौन, मित्रपक्षांची धावपळ आणि आकड्यांचा खेळ यामुळे सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार झाला आहे. अमरावती महापालिकेतील महापौर निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असली, तरी राजकीय पातळीवर मात्र कमालीची अनिश्चितता आहे. सर्वांच्या नजरा भाजपकडे लागल्या आहेत. निवडणूक निकालानंतरही भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने सत्ता स्थापनेवर स्पष्ट भूमिका न घेतल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे.
भाजपचे हे मौन ‘वादळापूर्वीची शांतता’ असल्याचे मानले जात आहे. मित्रपक्षांच्या रोजच्या विधानांमुळेही गोंधळ अधिक वाढला आहे. शहरातील राजकारण सध्या पूर्णतः आकड्यांभोवती फिरत आहे. कोणाकडे किती संख्याबळ आहे, कोण कोणाला साथ देऊ शकतो आणि आरक्षणानंतर चित्र कसे बदलेल, यावरच सत्तेचा मार्ग ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच सर्व पक्ष आपले पत्ते उघड करण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपचे रहस्यमय मौन, दुसरीकडे मित्रपक्षांची अस्वस्थता आणि तिसरीकडे आरक्षणाची प्रतीक्षा या साऱ्यांमुळे अमरावतीतील महापौरपदाची लढत अधिकच रोचक झाली आहे. गुरुवारी (२२) होणाऱ्या आरक्षणावर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
राज्यात महायुतीचा भाग असले तरी अमरावतीतील वास्तव वेगळे आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते स्पष्ट शब्दांत म्हणाले, ‘जर युवा स्वाभिमान पक्ष सत्तेत सहभागी झाला, तर आम्ही त्यापासून दूर राहू.’ या विधानामुळे संभाव्य युतींचे गणित आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
युवा स्वाभिमान पक्ष भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षासोबत भाजपने मतदानाच्या अवघ्या चार दिवस आधी युती तोडली. मागील निवडणुकीच्या तुलनेत पाच पट जागा जिंकून या पक्षाने भाजपच्या सत्तागणिताला मोठा धक्का दिला आहे. सध्या हा पक्ष दररोज ‘महापौर भाजपचाच’ असे वक्तव्य देत आहे.
दोन्ही शिवसेना शांत नामांकन अर्जाच्या अंतिम टप्प्यात भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिंदे गटाने स्वबळावर, तर उबाठाने काँग्रेससोबत निवडणूक लढवली. काँग्रेसने मागील निवडणुकीतील आपला आकडा कायम ठेवला, तर शिवसेना (उबाठा) केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. सध्या दोन्ही शिवसेना गट शांत भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
सोमवारी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी समविचारी पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी जाहीर झालेली संख्याबळाची आकडेवारी या दाव्यांशी जुळत नसल्याने काँग्रेसच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एआयएमआयएमने सध्या तटस्थ भूमिका घेतली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच ते आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी चिन्हे आहेत. सत्तेत सहभागी झाल्यानंतरच युतीचे समायोजन केले जाईल, असे संकेत मिळत आहेत.