
१५ दिवसांपासून घंटागाड्या बेपत्ता, महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत शहर घाणीच्या विळख्यात
महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने शहराच्या नियमित स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी मनपा स्वच्छता विभागाने ०७२१२६७२३००, ७५१७५१६१६२ हे २ हेल्पलाइन क्रमांक तसेच मोबाइल क्रमांक ७०३००९२६४८ जाहीर केला. मात्र, हेल्पलाइन सुरू झाल्यापासून मनपाकडे अस्वच्छतेबाचत १५० हुन अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये घराघरातून कचरा संकलन न होणे, सार्वजनिक नाल्यांची साफसफाई न होणे, गल्ली व रस्त्यांवर कचरा साचून राहणे, मेलेली जनावरे तशीच पडून राहाणे तसेच इतर अस्वच्छतेच्या तक्रारींचा समावेश आहे.
दरम्यान, आर्थिक चणचणीत असलेल्या मनपाद्वारे झोननिहाय स्वच्छता कंत्राटदारांना नियमित देयके दिली जात नसल्याने हे कंत्राटदार चांगलेच त्रस्त व नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीत मनपाने शहरातून संकलित होणारा कचरा कंपोस्ट डेपोपर्यंत वाहून नेण्याचे ‘अ’ कंत्राट कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिले आहे. तसेच त्यांच्या ‘ब’ कंत्राटानुसार आणीबाणीच्या काळात त्यांना घरोघरी जाऊन कचरा संकलनही करावे लागणार आहे. ही बाब काही अंशी झोननिहाय स्वच्छता कंत्राटदारांना खटकली असून त्यामुळे त्यांच्या कामातील लक्ष हळूहळू ढळत चालले आहे. याचा थेट परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होत असून अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. मनपा प्रशासनासह नव्याने सत्ता स्थापन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांपुढे शहर स्वच्छ ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असून, यावर ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
कोणकोणत्या प्रभागात घंटागाडी निवडणुकीच्या काळात फिरकली नाही, याबाबत तत्काळ सॅनिटरी इन्सपेक्टरला (एसआय) माहिती घेण्यास सांगणार आहे. तसेच स्वच्छता कंत्राटदारालाही याबाबत कळवून तत्काळ कारवाई करण्यास सांगितले
जाईल, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय स्वच्छता अधिकारी डॉ.अजय जाधव यांनी दिली.
महानगर पालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिले, त्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे तर स्वच्छता कंत्राटदारांनाही मनपाकडून नियमित देयक (बिल) मिळत नसल्याने तेही वैतागले आहेत. क्षितीज नागरिक बेरोजगार सहकारी संस्थेने झोन क्र. ३ दस्तूरनगरचे स्वच्छता कंत्राट सोडले आहे. इतर स्वच्छता कंत्राटदारही याच विचारात आहेत. मात्र, अद्याप त्यांनी कंत्राट सोडले नाही. दस्तूरनगर झोनमध्येही सर्वत्र कचरा साठला असून मनपाला येथील स्वच्छतेसाठी आणखी ३ ते ४ दिवस लागणार आहेत.