Chandrapur News: डिजिटल युग तरीही बँकेत रांगा! प्रशिक्षणाच्या अभावामुळे वृद्ध व अशिक्षित ग्राहक अडचणीत
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग व्यक्ती आणि ग्रामीण भागातील लोकांना या रांगामुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. डिजीटल व्यवहारांसाठी एटीएम, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि यूपीआयसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतु सामान्य ग्राहकांना त्यांचा वापर करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळत नाही. अनेक वृद्धांना स्मार्टफोन वापरणे कठीण जाते. तर ग्रामीण भागात नेटवर्क समस्या गंभीर बनली आहे. एटीएममध्ये अनेकदा पैसे संपतात. एटीएम बंद असतात किंवा तांत्रिक बिघाड होतो. परिणामी, ग्राहकांना पैसे काढण्यासाठी पुन्हा बँक शाखांमध्ये जावे लागते. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने केवळ एक किंवा दोन काउंटरवर काम केले जाते. सरकारी योजनांचे अनुदान, किसान सन्मान निधी, वृद्धापकाळ पेन्शन आणि विधवा पेन्शन काढण्याच्या दिवसांत बँकांमध्ये गर्दी असते. (फोटो सौजन्य – Pinterest)
एकीकडे सामान्य ग्राहकांना सरकारी बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. तर दुसरीकडे श्रीमंत आणि व्यावसायिकांचे मोठे व्यवहार कॅश काउंटरच्या मागच्या दाराने होत असल्याचे चित्र आहे. बँकांमध्ये ग्राहक पाहून व्यवहार होत असल्याने सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.
BMC Mayor Reservation : आरक्षण सोडतीवरुन पेटलं रान! BMC आरक्षणावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप
डिजीटल तंत्रज्ञानाचा व्यापक प्रचार होऊनही त्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीत. फक्त अॅप्स आणि योजनांची घोषणा करणे आणि त्यांना ‘डिजीटल’ असे लेबल लावणे पुरेसे नाही. यासाठी पायाभूत सुविधा, पुरेसे कर्मचारी, डिजीटल साक्षरता मोहीम आणि थेट ग्राहक समर्थन आवश्यक आहे. आजही, बँकांबाहेर लांब रांगा हा डिजीटल युगाचा एक मोठा विरोधाभास आहे. जर सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाच्या नावाखाली समस्यांना तोंड द्यावे लागत असेल, तर असा प्रश्न पडतो की त्या तंत्रज्ञानाचा फायदा प्रत्यक्षात कोणाला मिळत आहे.






