मनपा निवडणुकीत दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला
महापालिका निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी युती, शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक चार या मुस्लिमबहुल भागात एमआयएम आणि समाजवादी पक्ष यांच्यात मुख्य लढत असली तरी अखेरच्या टप्प्यात काँग्रेसनेही तेथे जोर पकडला आहे. हा भाग वगळता शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये युती, शिवसेना आणि मविआ यांच्यात सरळ लढत होत आहे.
वचननामा, संकल्पनाम्याचे राजकारण! कोणाच्या विकास पुस्तिकेवर ‘विश्वास’ दाखवायचा? मतदारांना प्रश्न
शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मोठ्या संख्येने असल्याने आपापल्या जागा राखण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप या दोन युवा नेत्यांनी संपूर्ण निवडणूक प्रचार, नियोजन आणि यंत्रणेवर पकड ठेवली आहे. एकीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन सुरू असतानाच, दुसरीकडे भाजपमधील नाराज निष्ठावंतांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. अखेरच्या टप्प्यात नाराज कार्यकर्तेही सक्रिय झाल्याने भाजप, पर्यायाने युतीची ताकद वाढल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा भाजप–युतीसाठी मोठे बळ ठरत आहे. राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांनी व्यूहरचना आखत प्रचारात मुसंडी मारली असून वैयक्तिक गाठीभेटींवर त्यांचा विशेष भर आहे. भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा, मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारफेऱ्या, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सभा आणि फेऱ्या पार पडल्या. राष्ट्रवादीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियोजित सभा मात्र अचानक रद्द झाली.
शिंदे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याऐवजी मंत्री उदय सामंत यांची सभा जाहीर करण्यात आली आणि तीही रद्द होऊन अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा पार पडली. महाविकास आघाडीकडून खासदार नीलेश लंके ‘किल्ला लढवत’ असून काँग्रेस नेते खासदार इम्रान प्रतापगडी यांची सभा झाली. मात्र ही सभा मुस्लिमबहुल भागातच झाल्याने शहरातील इतर भागात तिचा फारसा प्रभाव जाणवला नाही.
मतदानापूर्वी आलेल्या रविवारच्या सुटीचा सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पुरेपूर फायदा घेतला. सुटीच्या दिवशी घरी असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी घरोघरी भेटी देण्यावर भर दिला. तसेच प्रचारासाठी ध्वनिक्षेपक लावलेल्या रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. आवाजाच्या मर्यादा पाळल्या न गेल्याने हा रविवार शहरासाठी अक्षरशः कर्णकर्कश ठरला.
प्रचारासाठी राज्यस्तरीय नेते न आल्याने शिंदे शिवसेनेत काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. पक्षाचे बहुतांश स्थानिक नेते स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने ते आपापल्या प्रभागांपुरते मर्यादित राहिले आहेत. परिणामी नव्या उमेदवारांना अपेक्षित ताकद मिळण्यात अडचणी येत आहेत.
प्रचाराचे अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले असून कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि पकडलेला जोर ढिला पडू नये यासाठी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी प्रचार यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवले आहे.






