सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांचे एका मुद्द्यावर एकमत झाल्याचे दिसून आले (फोटो - सोशल मीडिया)
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, डिलिमिटेशनचं बिल आमच्याजवळ आलेलं नाही. बिल आल्यावर आमचा पक्ष भूमिका स्पष्ट करेन.’ याचबरोबर संजय राऊतांच्या आरोपांवर त्या म्हणाल्या, ‘सशक्त लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.’ याचबरोबर सध्या राज्यावर दुष्काळी संकट ओढावले असून बळीराजाला सरकारकडून मदतीची गरज आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही स्वत: दर आठवड्याला आमच्या लोकसभा मतदारसंघात आढावा घेत आहे. प्रश्न गंभीर आहे. आम्ही सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. शेवटच्या माणसाला मदत कशी केली जाईल, यासाठी प्रयत्नशील आहोत.”
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्यामुळे डिलिमिटेशन या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादीचे एकमत झाल्याचे दिसून आले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा, आदरणीय सुप्रियाताईंनी एक स्पष्टपणाची भूमिका मांडली, की ज्या वेळेला डिलिमिटेशनचं बिल येईल, महिला आरक्षणाचं बिल येईल आणि समान पद्धतीवरती सर्व राज्यांच्यामध्ये तितक्याच दीडपट जागा वाढतील, अशा बिलाला आमचं समर्थन असेल. हा जो तात्त्विक मुद्दा आहे, देशाच्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा गाभा आहे, तोच त्याला अनुसरूनच खासदार सुप्रियाताईंचं ते वक्तव्य आहे. निश्चितपणाने स्वागतार्ह आहे.”
पुढे तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने, निराधार आरोप करणं किंवा पवार साहेबांच्या पक्षातील काही खासदार इकडे-तिकडे जाणं, कल्पोकल्पित कथा रचत अशा पद्धतीची राजकीय वक्तव्यं करणं, असे प्रकार वाढलेले आहेत. खरं तर आम्ही सर्वांनीच राजकीय पक्षांनी या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. सिद्धांतावरती मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा पद्धतीची टीका-टिप्पणी करून आपण लोकशाहीचंच अवमूल्यन करतो आहोत. हे अनेक दुर्दैवाने का ते विसरतात, हे मला कळू शकत नाही.”
Ans: डिलिमिटेशनचे बिल अद्याप त्यांच्याकडे आलेले नाही. बिल आल्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Ans: सर्व राज्यांमध्ये समान पद्धतीने जागा वाढविणाऱ्या डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या विधेयकाला समर्थन देण्याची भूमिका तात्त्विकदृष्ट्या योग्य असल्याचे सांगत तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
Ans: डिलिमिटेशनच्या विधेयकाबाबत सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकांमध्ये सकारात्मक साम्य दिसून आले आहे. मात्र, यावरून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा निष्कर्ष काढता येत नाही.






