
Aditi Pohre
मुंबई : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीची (MLC Election 2026) रणधुमाळी आता सुरू झाली आहे. निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. इच्छुकांनीही आपापल्या मतदारसंघात तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अदिती पोहरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अदिती पोहरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अदिती पोहरे यांना अमरावती शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
अदिती पोहरे या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. त्यांचं शिक्षण बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग, एम.ई. स्ट्रक्चरल डिझाईन आणि एम.ए. मानसशास्त्र असं आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचा अनुभवही त्यांच्या प्रोफाइलमध्ये आहे.
अदिती पोहरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राशी जोडलेली आहे. त्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यांच्या सासरे प्रकाश पोहरे हे ‘देशोन्नती’चे संस्थापक-संपादक असून शेतकरी चळवळीशी संबंधित म्हणून त्यांची ओळख आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात शिवाजी शिक्षण संस्थेशी संबंधित मतदारांची संख्या महत्त्वाची असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चांना उधाण आलं आहे. पुणे शिक्षक जागेवर भाजप आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. उपलब्ध माहितीनुसार संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे, तर नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर जागा भाजपकडे जाण्याची चर्चा आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे.
अधिसूचना : 29 सप्टेंबर 2026
उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख : 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी : 7 ऑक्टोबर 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 ऑक्टोबर 2026
मतदान : 23 ऑक्टोबर 2026, सकाळी 8 ते दुपारी 4
मतमोजणी : 27 ऑक्टोबर 2026