मतदाराच्या नावाचा 'बॉम्बस्फोट' म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण (Photo - Social Media)
सातारा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत (Pune Teachers Voter List) अजब प्रकार घडला आहे. मतदार यादीत झालेल्या एका अजब नोंदीमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. साताऱ्यातील वाई तालुक्यातील मतदार प्रशांत बोंबले यांच्या नावाऐवजी मतदार यादीत चक्क ‘प्रशांत दादासाहेबाची बॉम्बस्फोट’ अशी विचित्र नोंद झाल्याचं समोर आलं. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं.
प्रशांत बोंबले यांच्या वडिलांचं नाव दादासाहेब आहे. मात्र, मतदार यादीतील मराठी नोंदीमध्ये ‘दादासाहेब’नंतर थेट ‘बॉम्बस्फोट’ हा शब्द आल्याचं दिसून आलं. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून ही बाब समोर आणत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
मतदार यादी तयार करताना आणि अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी अशा नोंदींची पडताळणी होते का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे मतदाराची ओळख आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये नाव अचूक असणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
दरम्यान, या प्रकरणावर सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मतदार यादी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध केली जाते. प्रशांत बोंबले यांचं नाव इंग्रजीमध्ये योग्य असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र, मराठी भाषांतर करताना सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटी किंवा मानवी चुकीमुळे ही विचित्र नोंद झाली असावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
प्रशासनाने संबंधित नोंद तातडीने दुरुस्त केली असून 6 ऑक्टोबर रोजी दुरुस्त केलेली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रकारासाठी जे अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
या प्रकरणामुळे मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेतील पडताळणी यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी प्रत्येक नोंद बारकाईने तपासली जाते का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, प्रशांत बोंबले यांनी या प्रकरणावर माध्यमांशी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव आहे का, याबाबत सध्या केवळ चर्चा आहे; त्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे आता 6 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत प्रशांत बोंबले यांचं नाव अचूक पद्धतीने नोंदवलं जातं का, याकडे लक्ष लागलं आहे.






