
( फोटो सौजन्य : AI )
धारणी मुख्यालयाशी थेट जोडणारा हा रस्ता आठ गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, बांधकामाच्या सुरुवातीपासूनच या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, दीड वर्षाच्या आतच संपूर्ण डांबरीकरण नामशेष झाले आहे. सध्या या मार्गावर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
या रस्त्याची व्यथा मांडताना धुळघाट (रेल्वे) च्या सरपंच जिजाबाई रामेश्वर कासदेकर यांनी प्रशासनावर सडकून टीका केली आहे. त्या म्हणतात, “कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला हा रस्ता सहा महिनेही टिकला नाही. पावसाळ्यात आरोग्य आणीबाणीच्या वेळी याच मार्गाने गर्भवती महिलांना धारणीला न्यावे लागते, पण मोठ्या खड्ड्यांमुळे प्रसूतीदरम्यान रुग्णांचे प्राण धोक्यात येतात.” हा रस्ता केवळ प्रवाशांसाठीच नाही, तर शाळकरी मुले आणि शेतकऱ्यांसाठीही दररोजचा प्रवास नरकयातना ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून, प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
‘निकृष्ट काम करा आणि सरकारी तिजोरी लुटून स्वतःची घरे भरा’, हीच कार्यपद्धती या कामात दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कंत्राटदार तसेच देखरेख करणाऱ्या अभियंत्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर या रस्त्याची त्वरित दुरुस्ती झाली नाही, तर येणाऱ्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे इतिहासजमा होईल, यात शंका नाही. मेळघाटातील जनतेचा वाढता रोष पाहता, प्रशासन आता खड्डे भरून रस्ता दुरुस्त करणार की जनतेच्या संयमाचा अंत पाहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मेळघाटवासीयांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला असून, त्यांना रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली होणारी फसवणूक आता अजिबात मान्य नाही.