
Nana Patole
Nana Patole : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या भूमिकेवरून देशातील राजकीय वातावरण तापलेलं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेशकुमार हे भाजपाच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप करत पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. फडणवीस ज्ञानेशकुमारांचा बचाव करत असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकार पुराव्यांसह समोर आणले आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपाला फायदा होईल, अशा पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील कथित कारभार समोर आल्यास भाजपाला अडचणींचा सामना करावा लागेल, त्यामुळे भाजपाचे मुख्यमंत्री आणि मंत्री ज्ञानेशकुमार यांचा बचाव करत असल्याचा दावा पटोलेंनी केला.
निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला आहे. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही व संविधान संपवण्याचे पाप ते करत आहेत. ज्ञानेशकुमार व भाजपा यांची अभद्र युती आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणताच भाजपाचे मुख्यमंत्री ज्ञानेशकुमार यांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावतात. खरे तर मेंदू हा भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच चोरीला गेला आहे, असे सणसणीत उत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
ज्ञानेशकुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत पटोलेंनी मतदार नोंदणीच्या अर्ज-६ मधील बदलांचाही मुद्दा उपस्थित केला. लाखो तरुण तसेच विविध जाती-धर्मातील मतदारांची नावे कमी करण्याचे काम ठरवून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेचाही पटोलेंनी उल्लेख केला. काही वृत्तांनुसार मोठ्या संख्येने नावे वगळण्यात आली आणि अनेक प्रकरणांवर सुनावणी झाली. या प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्याचेही वृत्त समोर आले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने अंतर्गत मतभेद हे निर्णयप्रक्रियेतील सामान्य बाब असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयोगाने मतदार यादीतील बदलांच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पावलेही उचलली आहेत.
ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून मोर्चे काढले जात असल्याबाबत विचारलं असता, लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या पक्ष-संघटनांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनांनाही काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात शिवसेना व मनसे मोर्चा काढत आहेत, या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष वा संघटना लढत आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. या युदधात जे कोणी पुढे येत असतील त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मतचोरी व फिक्सिंग केले जात आहे, त्याविरोधात देशातील जनतेने लढा पुकारला आहे. ही तर सुरुवात आहे, लढाई मोठी असून ती सुरुच राहणार आहे. ज्ञानेशकुमारला पदावरून हटवण्यासाठी जे लढत आहेत, त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष आहे,” असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.