चहल यांच्या नियुक्तीवर विरोधकांचे प्रश्न, आरोपांची नव्याने चौकशी करण्याची मागणी
मुंबई: महापालिकेचे माजी आयुक्त प्रशासकीय अधिकारी इक्बाल सिंग चहल यांची महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) म्हणून नियुक्ती करून त्यांना गृह मंत्रालयात मोठी जबाबदारी दिली आहे. तर याआधी ते मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव होते. परंतु, कायदा व सुव्यवस्थेची नवी जबाबदारी दिल्यावर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. नवी जबाबदारी दिल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत ज्या अधिकाऱ्यावर अनेक आरोपांची चौकशी सुरू असताना अशा अधिकाऱ्याला कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे, असा आरोप केला. या पोस्टिंगचा खरपूस समाचार घेत शिवसेना उद्धव गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी ‘आरोपांची नव्याने चौकशी करण्याच्या मागणीचा पुन्हा केली आहे.
आनंद दुबे म्हणाले की महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या विरोधात स्ट्रीट फर्निचर घोटाळा, कोविड घोटाळा आहे ज्याची ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा द्वारे चौकशी सुरु आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चहल यांच्यावर स्ट्रीट फर्निचर बसवण्यासाठी 263 कोटी रुपयांची निविदा काढण्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यांनी या विषयावर चहल यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते आणि विधिमंडळाच्या अधिवेशनातही या प्रश्नाचे पडसाद उमटले होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ही निविदा रद्द करण्यात आली. बदलापूर लैंगिक छळ प्रकरणानंतर एकीकडे राज्य सरकारची विश्वासार्हता असतानाच दुसरीकडे निवडणुकीपूर्वी ही बदली करून शिंदे सरकारने इक्बाल सिंग चहल यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.