मुंबई : दहीहंडी (Dahihandi Case) उभारताना घालून देण्यात आलेल्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेले मनसेने पदाधिकारी अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अटकपूर्व जामीन (Bail To Avinash Jadhav And Abhijeet Panse) मंजूर करण्यात आला आहे. अटक झाल्यास २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश दिले.
गोपाळकाला उत्सव साजरा करताना जागोजागी उभारण्यात येणाऱ्या दहीहंड्या फोडण्यासाठी उंच मानवी मनोरे उभे राहतात. त्यात अनेक गोविंदा जखमी होतात. त्यावर निर्बंध लादत २० फूटांच्यावर हंडी लावण्यात मनाई करण्यात आली होती. तसे असतानाही २०१६ रोजी ठाणे जिल्ह्यात मनसेचे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांनी ४० फूटांवर हंडी उभारली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जाधव आणि पानसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आता पुन्हा दोघांनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती.
त्या अर्जावर न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र दोघेही पोलिसांसमोर हजर झाले नाहीत म्हणूनच त्यांना दिलासा देण्यास ठाणे न्यायालयाने नकार दिला असल्याचे सरकारी वकिलांकडून सागण्यात आले. त्यावर प्रकरण २०१६ मधील आहे गुन्हा दाखल झाल्यापासून तपास अधिकाऱ्यांनी तपासाचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि अचानक जाधव आणि पानसेंना पोलीसांकडून नोटीस बजावण्यात आली. हे एक राजकीय षडयंत्र आहे त्यामुळे अटक होण्याच्या भितीपोटी दोघेही पोलिसांसमोर हजर झाले नाहीत असा युक्तिवाद जाधव आणि पानसे यांच्यावतीने कऱण्यात आला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांची याचिका मान्य करत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.