बीड : देशातील लोकसभेच्या 543 जागांसाठीची मतमोजणी मंगळवारी (दि.4) झाली. त्यात अनेक दिग्गज नेतेमंडळींचा पराभव झाला तर काहींनी विजय खेचून आणण्यात यश मिळवले. त्यात बीडचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, आता सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
बीड लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यात सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. याच ऐतिहासिक यशानंतर सोनवणे हे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघाले होते. मात्र, याचदरम्यान त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. जालना जिल्ह्यात धुळे-सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला.
बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी दुसऱ्या गाडीला धडकली. या अपघातात काहीजण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. बजरंग सोनवणे यांच्यासोबत असलेले सर्वजण सुखरूप असल्याची माहिती दिली जात आहे.