बारामती : रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शरयू फाऊंडेशन व बारामती रनर्स यांनी आयोजित केलेल्या बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धेकरिता विक्रमी नाव नोंदणी झाली आहे. सदर स्पर्धा ही २१ व १० किलोमीटर अंतराची असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरिता ३ किलोमीटर फन रन चे देखील आयोजन केलेले आहे.
२१ व १० किलोमीटर स्पर्धे करिता १३०० च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला असून त्यामध्ये परदेशी धावपटुंचा देखील समावेश आहे. त्याच प्रमाणे देशभरातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून स्पर्धक येणार असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून स्पर्धक येणार आहेत.
फन रन करिता बारामती व परिसरातून १००० पेक्षा अधिक नागरिक व लहान मुलांनी नाव नोंदणी केली आहे. सदर स्पर्धा ही एम. ई. एस हायस्कुल, बारामती येथून सकाळी ६ वाजता सुरु होणार असून स्पर्धेचा मार्ग पेन्सिल चौक मार्गे कटफळ रेल्वे स्टेशन पासून पुन्हा एम. ई. एस हायस्कुल येथे समारोप होईल. स्पर्धेचा बक्षीस समारंभ देखील एम. ई. एस. हायस्कुल येथेच सकाळी ९ वाजता संपन्न होईल. बक्षीस समारंभा करिता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. अजित पवार व बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत.
तसेच भारताची सुर्वण कन्या पद्मश्री सुधा सिंह, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत व माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर या आंतरराष्ट्रीय धावपटू प्रमुख पाहुण्या म्हणून हजर राहणार असून नागरिकांनी ही स्पर्धा पाहण्या करिता व स्पर्धकांना प्रोत्सहन देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शरयू फाऊंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले आहे.