संभाव्य पाणी टंचाइ लक्षात घेवुन राजापूर नगर परिषदेने उपाययोजना करायला सुरुवात केली असुन जर शहरातील कोणी नागरिक पाण्याचा अपव्यय करताना दिसुन आल्यास त्याचे नळ संयोजन कोणतीही पुर्वकल्पना न देता तोडण्यात येइल असा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकानो पाणी जपुन वापरा, अपव्यय करु नका नाहीतर भर उन्हाळ्यात तुमच्यावर पाणी पाणी करण्याची वेळ येइल.
गतवर्षी राजापूर शहरातुन वाहणाऱ्या अर्जुना व गोड्या पाण्याच्या कोदवली नदीतील गाळ उपसा करण्याबरोबरच कोदवली येथील सायबाच्या धरणातील गाळ उपसाही करण्यात आला होता . त्यामुळे या वर्षी पाणी टंचाइची झळ बसणार नाही असे वाटत असताना वातावरणात दिवसेंदिवस वाढत जाणारी उष्णता पाहता पाणी टंचाइच्या झळा नागरिकाना जाणवण्याची दाट शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणुन राजापूर नगर परिषदेने १९ फेब्रूवारी पासुन आठवड्यातुन एक दिवस पाणी कपात करण्याचाही निर्णय घेतला आहे.
दरवर्षी राजापूर नगर परिषदेचा सर्वाधिक खर्च हा पाणी पुरवठ्यावर होत असतो. पाणीपट्टीच्या माध्यमातुन राजापूर नगर परिषदेला केवळ ३०,६१,८००/- इतके तुटपुंजे उत्पन्न मिळत आहे . राजापूर नगरपरिषदेकडून शहर हद्दीतील नागरिकांना तसेच कोदवली ग्रामपंचायत हृददीतील नागरिकांना व धोपेश्वर ग्रामपंचायत हददीतील नागरिकांना नळ संयाजनाव्दारे दररोज पाणी पुरवठा करणेत येत आहे. त्याकामी शहरातील नागरिकांकडून वार्षिक र.रु.१०००/-, व्यावसायीक यांचेकडून र.रु.२८००/- वार्षिक, कोदवली ग्रामपंचायत हददीतील नागरिकांकडून वार्षिक र.रु. १५००/- तसेच धोपेश्वर ग्रामपंचायत हददीतील नागरिकांकडून र.रु. १६००/- वार्षिक इतकी पाणी पटटी आकारणेत येत आहे. परंतु सदरील पाणी पटटी ही फारच तुटपुंजी असल्याने त्याव्दारे मिळणारे उत्पन्न हे फारच कमी प्रमाणात मिळत आहे. पाणी पुरवठा विभागाकडे सध्या कायम स्वरुपी ४ कर्मचारी तसेच आऊटपुट बेसीसवर साधारणतः १८ कर्मचारी आहेत. त्याकामी त्यांचे वेतनावर वार्षिक सुमारे र.रु. ४५,६०,०००/- मात्र अंदाजित खर्च करणेत येत आहे.
तसेच पाणीपुरवठा करणेसाठी शिळ जॅकवेल धरण असून त्याठिकाणाहून पंपाब्दारे पाणी घेवून त्याचा पुरवठा शहरात तसेच बाहेरील हददीत करणेत येतो. तसेच शहरातील पाणीपुरवठा टाक्यान्मध्ये पंपाद्वारे पाणी घेऊन त्याचा साठा टाकीमध्ये केला जातो. त्यामुळे वार्षिक वीजबील अंदाजित र.रु.३१,८०,०००/- इतके बील मराविवि. कंपनी, राजापूर यांना आदा केले जाते. तसेच लाईट गेल्यास त्याठिकाणी जनरेटर बसवून पाणी त्याव्दारे शिळ जॅकवेल येथील साठवण टाकीतून तालीमखाना तलाव येथील साठवण टाकीत पाण्याचा साठा करणेत येतो. तसेच पाणी टंचाईकाळात पाण्याचा साठा कमी होत असल्याने त्यासाठी खाजगी टैंकरव्दारे पाणी आणून ते साठवण टाकीत साठविले जाते व पाणी पुरवठा केला जातो. यासाठी जनरेटर भाडे व टैंकर भाडयाची अंदाजित र.रु. ७,५०,०००/- मात्र खर्च होत आहेत. तसेच पाणीपुरवठा लाईनमध्ये बिघाड झाल्यास त्याकामी घेणेत येणारे मटेरिअलचा खर्च वार्षिक र.रु. ७,५०,०००/- होत आहे.
तरी पाणीपट्टीच्या रुपाने सर्व नळ संयोजनामधून नगरपरिषदेला अंदाजित वार्षिक र.रु. ३०,६१,८००/- इतके उत्पन्न मिळत असून, खर्च अंदाजित र.रु. ९२,४०,०००/- अंदाजित होत आहे. यामुळे नगरपरिषदेचे उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असून, नगरपरिषदेला उत्पन्नापेक्षा जादा खर्च करावा लागत आहे.
हा जादा करावा लागणारा खर्च भरुन काढण्यासाठी राजापूर नगर परिषद पाणी पट्टीत वाढ करण्याच्या विचाराधिन आहे व त्याची अम्मलबजावणी यावर्षी पासुन होण्याची शक्यता आहे.
त्यातच शहरातील व शहराबाहेरील अनेक नागरिक अगदी टंचाइच्या काळात देखील पाण्याचा अपव्यय करत असल्याचे नगर परिषदेच्या निदर्शनास आलेले आहे . परिणामी अशा नागरिकांचे नळ संयोजन सदर पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकाना कोणतीही पुर्व कल्पना न देता त्याचे नळ संयोजन कट करण्याचा निर्णय राजापूर नगर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही पाणी वाया घालवत असाल तर सावधान ! वेळीच जागे व्हा ! अन्यथा तुमचे नळ संयोजन कधीही कट केले जावु शकते व त्यामुळे तुम्हाला पाणी टंचाइच्या काळात पाणी पाणी करावे लागु शकते.