फोटो सौजन्य - सोशल मिडीया
पुण्यातील पर्यटनाचं खास आकर्षण असलेलं भीमाशंकर अभयारण्य व श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. पावसाळ्यातील पर्यटनासाठी भीमाशंकर अभयारण्य व श्री क्षेत्र भीमाशंकर खास आकर्षण ठरतं. या अभारण्यात असणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटक या अभयारण्याला भेट देतात. मात्र आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत भीमाशंकर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. याबाबत उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण यांनी माहिती दिली आहे.
पुण्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे भीमाशंकर अभयारण्य परिसरातील रस्ता धोकादायक होतो. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत भीमाशंकर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असल्याचे वन विभागानं सांगतिलं आहे. वनपरिक्षेत्र भिमाशंकर अभयारण्य – १ तसेच वनपरिक्षेत्र भिमाशंकर अभयारण्य-२ मधील धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
भिमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना पर्यटनावेळी नियमांचे काटेकोर पालन करावं लागेल, तसेच पर्यटकांना प्रशानसनाला सहकार्य करावं लागेल. भिमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अवैधरित्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायदया अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे यांनी दिला आहे.
भीमाशंकर प्रमाणेच नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प देखील आजपासून पुढील ३ महिने पर्यटनासाठी बंद राहणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील खास आकर्षण म्हणून ओळखला जाणारा नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प आजपासून पुढील ३ महिने पर्यटनासाठी बंद राहणार आहे. नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना ३० सप्टेंबरपर्यंत नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांचे दर्शन होणार नाही. पावसाळ्यात जंगलातील अंतर्गत रस्त्यांवर पर्यटकांची वाहने चालविणं धोकादायक ठरू शकतं. तसेच पावसामुळे जंगलातील प्राण्यांचं दर्शन देखील होत नाही. याच पार्श्वभूमीवर नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी ३ महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.