
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या मोठ्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही काँग्रेस हायकमांडने दिल्ली वारीचे फर्मान सोडल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावून चर्चा केली जात असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) काँग्रेसमधील विलीनीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय समीकरणे आणि आघाड्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होती. पण काही कारणास्तव निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे.देशाची सैंविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशातच सेल्युलर मतांचे विभाजन थांबवण्यासाठी, देश आणि संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहेत, त्यांनी एकत्रित आले पाहिजे, यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
भाजपला रोखण्यासाठी देशपातळीवर आघाडी उभी करण्यासाठी पवार साहेब, तृणमूल काँग्रेस हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मानसिकतेती आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या सगळ्यांकडून त्यासंदर्भात विचारमंथन सुरू आहे. सेक्युलर मतांना एकत्रित करून आता मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हा एकमेव अजेंडा आहे. मोदी सरकारकडून देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याच आणि त्याची पाळंमुळ खोदण्याचं काम सुरू आहे,अशी टीकाही नाना पटोले यांनी यावेळी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसपासून वेगळे झालेले समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेससोबत एकत्र यावेत, असे मत व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपविरोधी राजकारण अधिक प्रभावी करण्यासाठी काँग्रेसची ताकद वाढवणे आवश्यक आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केलेल्या नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार करावा आणि त्यासाठी पुढाकार शरद पवार यांनी घ्यावा, असेही त्यांनी म्हटले होते.
राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील प्रमुख नेत्यांकडे या चर्चेबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. मात्र, पक्षातील नेत्यांनी कोणतीही ठाम भूमिका न मांडता अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांचाच असेल, असे स्पष्ट केले.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भातील कोणताही निर्णय शरद पवार घेतील. त्यामुळे यावर मी भाष्य करणार नाही.” तर “आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. पक्षाच्या भविष्यासंदर्भातील निर्णय शरद पवार घेतील,” असे सांगत आमदार रोहित पवार यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चांबाबत सावध भूमिका घेतली. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत सध्या कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या केवळ राजकीय पातळीवरील अंदाज आणि शक्यतांपुरत्याच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भविष्यासंदर्भात विविध चर्चा सुरू असल्या तरी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी अंतिम निर्णयाचा अधिकार शरद पवार यांच्याकडेच असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावर शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.