संग्रहित फोटो
कव्वालीच्या कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटात हिंसक संघर्षात झाले, लाठ्या, काठ्या आणि तलवारीने हाणामरी झाली. यात शिवसेना शिंद गटाचे नगरसेवक शेख अनवर उर्फ अनु शेख अली (४२, रा. हाकीम कॉलनी, देऊळगाव राजा) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित आसीफ उर्फ आरीफ हारून पठाण (३५, रा. देऊळगाव राजा) गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान जालना येथे मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शेख अतिक शेख उमर (३३. रा. प्रतापनगर, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेख अकीब शेख पाशु याच्यासह इतर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप आहे. आरोपींनी चाकू, लाकडी दांडा, कुऱ्हाड आदी हत्यारे हातात घेऊन नातेवाईकांच्या घरात तसेच घराबाहेर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात तक्रारदाराचे नातेवाईक आसीफ पठाण यांच्यावर चाकू व कुऱ्हाडीने गंभीर वार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच अन्य काही व्यक्तींनाही मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरदुसऱ्या गटाकडून शेख मुजाहिद शेख अली (४६, रा. हाकीम कॉलनी, देऊळगाव राजा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यांच्या तक्रारीनुसार, शाहरुख खान अहमद खान याच्यासह इतर आरोपींनी कट रचून तक्रारदार व त्याच्या भावावर हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपींनी काठ्या, चाकू व लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात तक्रारदाराचा भाऊ शेख अनवर उर्फ अनु शेख अली (४२, रा. हाकीम कॉलनी, देऊळगाव राजा) गंभीर जखमी झाले. त्यांचाही मृत्यू झाला. तसेच तक्रारदार व साक्षीदारांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता कुवारे देऊळगाव राजा पोलिस ठाणे करीत आहेत.
घटनेची गंभीरता व संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करणे आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या, घटनेनंतर देऊळगाव राजा शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. पॉलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक आणि क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले आहे.
देऊळगाव राजा येथील दोन गटांतील हिंसक संघर्षात मृत्यू झालेल्या आसीफ उर्फ पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणताही आरीफ हारून पठाण आणि शेख अनवर उर्फ अनु शेख अली यांच्या पार्थिवावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक व क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले होते. शहरातील संवेदनशील भागातही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.






