
prataprao jadhav buldhana meeting
Buldhana News : यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकं अडचणीत आली आहेत. अनेक ठिकाणी पाण्याअभावी उभी पिकं वाळू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. अशा परिस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून उर्वरित पाणी तूर, कपाशी आणि हळद पिकांना एक वेळ सिंचनासाठी देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकं पूर्णपणे वाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे किमान एक वेळ पाणी मिळाल्यास पिकांना जीवदान मिळू शकते, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
या मागणीची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये किती पाणी उपलब्ध आहे, भविष्यात पिण्याच्या पाण्याची किती गरज भासू शकते आणि बाष्पीभवनामुळे किती पाण्याची घट होऊ शकते, याचा अभ्यास करण्यात आला.
पिण्याच्या पाण्याची गरज, संभाव्य पाणीटंचाई आणि त्याव्यतिरिक्त १० टक्के अतिरिक्त पाणीसाठा राखून उर्वरित पाणी शेतीसाठी वापरण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
केवळ पिकांचाच नाही, तर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्यासाठीही प्रकल्पातील पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे.
दरम्यान, उपलब्ध पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले आहे. हे पाणी केवळ सध्याच्या खरीप पिकांसाठी आणि चाऱ्याची गरज भागवण्यासाठी वापरावे. रब्बी हंगामातील पिकांसाठी या पाण्याचा वापर करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
एकंदरीत, पावसाअभावी संकटात सापडलेल्या बुलढाण्यातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे काहीसा आधार मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष किती पाणी उपलब्ध होणार आणि कोणत्या प्रकल्पातून कधी पाणी सोडले जाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Ans: तूर, कपाशी आणि हळद या खरीप पिकांना एक वेळ सिंचनासाठी प्रकल्पातील शिल्लक पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
Ans: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या.
Ans: नाही. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपलब्ध पाणी केवळ सध्याच्या खरीप पिकांसाठी आणि पशुधनाच्या चाऱ्यासाठी वापरण्याचे आवाहन केले आहे.