
खामगाव: राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसातील खंडामुळे पिकांवर होत असलेल्या परिणामाची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि शेतीची सद्यस्थिती समजून घेतली.
महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध
राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाऊस, पाणी आणि पिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून शेतशिवारातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी जाणून घेण्यावर भर दिला जात आहे. पिंप्राळा येथे पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती, पिकांना आवश्यक असलेले पाणी आणि शेतीसमोरील विविध अडचणी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.
प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केल्यामुळे स्थानिक पातळीवरील अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. पाहणीच्या आधारे संबंधित भागातील परिस्थितीचा अहवाल तयार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
खामगाव बुलढाणा जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या ताफ्याला घेराव घालत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काँग्रेसच्या कार्यकत्यांनी त्यांचा ताफा अडवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी पावसाच्या अभावामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, जळगाव, शेगाव, मलकापूर, अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडला असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची वस्तुनिष्ठ पाहणी करून दुष्काळसदृश परिस्थितीची नोंद घ्यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तातडीने करून नुकसानभरपाई देण्यासह पीकविमा, कर्ज व इतर शासकीय योजनांमधून आवश्यक मदत मिळवून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
खामगाव, ब्युरो. खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, संपूर्ण बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, या मागणीसाठी सत्याग्रह शेतकरी संघटनेने रविवारी पारखेड फाटा येथे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा ताफा अडविला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पारखेड फाटा येथे सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविला. बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाच्या अभावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावेळी सत्याग्रह शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू नाकाडे यांनी कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. जिल्ह्यात कोरडा किंवा ओला दुष्काळ निर्माण झाल्यानंतरही बुलढाणा जिल्ह्याला अनेकदा मदतीपासून वगळले जाते, असा आरोप त्यांनी केला. यापुढे तुटपुंजी मदत स्वीकारली जाणार नसून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली नाही तर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नाकाडे यांनी दिला. या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष समाधान भातुरकर, प्रदीप देशमुख, गणेश गावंडे, मनोज पाटील, विष्णू टाले, रामेश्वर डोबे, संजय फाटे, पुंडलिक यादगिरे, गौरव हेलगे, अर्जुन खानंदे, महेश हेलगे, गजानन यादगिरे, पांडुरंग पुराने, अनिल गवांदे, गणेश राखुंडे, विठ्ठल शिंदे, नारायण यादगिरे, गणेश भेलके, नंदकिशोर लाहूळकर, पवन टापरे आदी उपस्थित होते.