Malegaon Nagar Panchayat Plastic Ban Campaign
या मोहिमेदरम्यान नगर पंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यापारी, दुकानदार आणि बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले. प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश देत नागरिकांनी घराबाहेर पडताना सोबत कापडी पिशवी ठेवण्याची सवय अंगीकारावी, असे आवाहन करण्यात आले. (Malegaon News)
प्लॅस्टिक कचऱ्यामुळे नाल्या तुंबणे, परिसरात अस्वच्छता निर्माण होणे, माती व पर्यावरणाचे प्रदूषण वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्लॅस्टिकमुक्त शहर घडविण्यासाठी प्रशासनासोबतच व्यापारी आणि नागरिकांनीही जबाबदारीने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे या वेळी पटवून देण्यात आले, व्यावसायिकांनी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देण्याऐवजी कापडी पिशव्यांच्या वापरासाठी प्रोत्साहित करावे, असेही सांगण्यात आले.
केवळ प्लास्टिक बंदीच नव्हे, तर पाण्याची वाढती गरज आणि भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंवर्धनाचाही संदेश या मोहिमेतून देण्यात आला. नळ सुरू ठेवून पाण्याचा अपव्यय करू नये, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, गळती तातडीने दुरुस्त करावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान समजून त्याची बचत करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
ही मोहीम नगर पंचायतचे मुख्याधिकारी पंकज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी कर निरीक्षक अ. अजिज अ. सत्तार, स्वच्छता निरीक्षक किशोर पंडित, पाणीपुरवठा अभियंता योगेश तायडे, सहाय्यक कर निरीक्षक अरुण समुन्द्रे, शहर समन्वयक मोहम्मद मारुफ, तसेच सै. इरफान, प्रमोद भाऊ हरणे, कमलेश कोळी, अनंता घुगे, रिजवान भाई आदी उपस्थित होते.
नगर पंचायत मालेगावचे नगराध्यक्ष,ओमप्रकाश मधुकरराव खुरसडे म्हणाले की, प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी गंभीर धोका असून, त्यामुळे शहराच्या स्वच्छतेवर विपरित परिणाम होतो. प्लॅस्टिकमुळे मुक्या प्राण्याच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे माझे मालेगाव, स्वच्छ मालेगाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि व्यापाऱ्याने प्लॅस्टिक बंदी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पाण्याचा जपून वापर करून जलसंवर्धनाला प्राधान्य दिल्यास आपले मालेगाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून नक्कीच नावारूपास येईल.
नगर पंचायत मालेगावचे मुख्याधिकारी, पंकज सोनुने म्हणाले की, मालेगाव शहर प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ नगर पंचायत प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. जनजागृतीसोबतच नागरिकांच्या दैनंदिन सवयींमध्ये बदल होणे गरजेचे आहे. बाजारात जाताना प्रत्येकाने कापडी पिशवी सोबत ठेवावी, तर व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे पाणी ही मर्यादित आणि अमूल्य नैसर्गिक संपत्ती असल्याने त्याचा अपव्यय टाळून प्रत्येकाने जलसंवर्धनासाठी योगदान द्यावे.
Ans: प्लास्टिक बंदी आणि पाणी बचतीबाबत नगर पंचायतीने जनजागृती मोहीम राबवली.
Ans: प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले.
Ans: प्लास्टिक कचऱ्यामुळे नाल्या तुंबतात, अस्वच्छता वाढते आणि पर्यावरणाचे प्रदूषण होते.






