
Samruddhi Mahamarg Accident
या विचित्र अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. माहितीनुसार, सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तडेगाव फाट्याजवळ कंटेनर आणि सिमेंट मिक्सर यांच्यात अपघात झाला. या धडकेत सिमेंट मिक्सर महामार्गावर पलटी झाल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला.
अपघातग्रस्त वाहनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक वाहने घटनास्थळाजवळ थांबली होती. दरम्यान, सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने रस्त्यावर थांबलेल्या १५ ते १६ कारला जोरदार धडक दिली. एकापाठोपाठ अनेक वाहनांना धडक बसल्याने घटनास्थळी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाल्याचे भयावह दृश्य निर्माण झाले. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. दिवाळीच्या सणानिमित्त कुटुंबासह प्रवास करणाऱ्या वाहनांमध्ये महिला, वृद्ध नागरिक आणि इतर प्रवासी असल्याने घटनेचे गांभीर्य अधिक वाढले.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन आणि समृद्धी महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करून बाहेर काढले. त्यांना पुढील उपचारासाठी जालना तसेच छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांकडे हलविण्यात आले. अपघातातील जखमींची नेमकी संख्या आणि प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे, किनगाव राजा पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार भारत चापाईतकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी महामार्गाचे सुरक्षा कर्मचारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न केले. समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी निर्माण करण्यात आला; मात्र वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरू नये, यासाठी प्रशासनाने सुसाट वेगाला लगाम घालून सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावर सुसाट वेगाने धावणारी वाहने, अवजड वाहनांचा वेग आणि वाहनांमधील सुरक्षित अंतराचा अभाव यामुळे मोठ्या दुर्घटनांना निमंत्रण मिळत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. एखादा अपघात घडल्यानंतर त्याठिकाणी वाहने थांबतात आणि त्याच ठिकाणी पुन्हा दुसरा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. तडेगाव फाट्याजवळ घडलेली घटना याचेच गंभीर उदाहरण ठरली.
अजिंक्य विलास परमिल, विलास परमिल, मीना परमिल, नेहा परमिल (रा. नागपूर), अलम बाबू जान मियाँ, अश्रमेरी आलम अन्सारी बाबू जान मियाँ (रा मंचर पुणे), मनीष चंद्रभान काकडे, मनीषा काकडे, आरोही काकडे, आराध्य काकडे (रा. पुणे), आदित्य शरद कोठावळे, प्रियंका कोठावडे आरोही कोठावडे (रा. डोंबिवली), अनसुल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, शिकांश अग्रवाल (रा. छत्तीसगड), नितीन पद्माकर येसनकर, गायत्री येसनकर, सचिन येसनकर, निकिता येसनकर, शौर्य येसनकर, रियांश येसनकर (रा. मांडवगड, पो. सेवाग्राम, जिल्हा वर्धा), मयंक अशोक मिश्रा, रिचा मिश्रा, तनुष मिश्रा (रा. पुणे), मनोज बारबदे (रा. अमरावती), विक्रम धाक्रस (रा. नागपूर), गोपालसिंग जोगेश्वर, गौतम जोगेश्वरी (रा. अकोला), अभिजीत जावळकर (रा. पिंपरी चिंचवड), नितीन पद्माकर (रा. वर्धा), स्वप्निल पांडव (रा. अकोला), शुभम साळवे (रा. चोरपांग्रा, ता. लोणार) इतर प्रवाशांचे नावे मिळू शकले नाहीत.
Ans: सिंदखेड राजा तालुक्यातील तळेगाव फाट्याजवळ चैनल क्रमांक ३२० येथे अपघात झाला.
Ans: कंटेनरने रस्त्यावर थांबलेल्या १५ ते १६ कारला धडक दिली.
Ans: प्राथमिक माहितीनुसार, १० ते १५ प्रवासी जखमी झाले.