श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कॅमेरा, मोबाईलना बंदी; पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय (Photo Credit- Social Media)
पंढरपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेत मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
तसेच मंदिरातील कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना ओळखपत्र देण्याच्या सूचना देण्यात आली आहे. याशिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहलगाम घटनेनंतर पोलीस प्रशासनाने मंदिरातील सुरक्षितता वाढवण्यात आली आहे.
समितीने कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनाही दिला इशारा
मंदिरातील सर्व कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी समितीने दिलेले ओळखपत्र परिधान करण्याचे सक्तीचे केले आहे, अन्यथा कारवाईचा इशारा समितीने दिला आहे. कर्मचारी यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त ‘व्हीआयपी गेट’चा वापर करण्यात येणार असल्याचे श्रोत्री यांनी सांगितले.
दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्याची आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती दिली जात आहे.
लंडन येथे साकारले जाणार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर
श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर मूळ गाव अहिल्यानगर असून, सध्या लंडन येथे स्थायिक आहेत. ते लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहेत. त्यानिमित्ताने पादुकासह दिंडी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांच्याकडील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले होते.