मुंबई : स्त्रीयांमधील कर्कराेगाचे (Cancer in women) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. निदान करण्यास हाेत असलेला विलंब व जनजागृतीचा अभाव यामुळे स्त्रीयांमधील प्रमाण वाढत असलेल्याचे तज्ज्ञ डाॅक्टरांचे मत आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्कराेग (Cervical cancer) हे महिलांमध्ये कर्कराेगाच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्कराेगाच्या जगभरातील एक चतुर्थांश ओझे एकट्या भारतात आहे, असे चित्र सध्या दिसून येत आहे. तर दुसरीकडे पहिल्या मेड इन इंडिया म्यूएचपीव्ही लसीला डीजीसीआयने अलीकडेच मंजुरी दिली असली तरीही, या लसीची प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात अजून वर्ष उलटण्याची शक्यता वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत, ही लस खरेदी करण्यापासून ९ ते १४ वर्षाच्या वयाेगटातील मुलींची संपूर्ण माहिती संकलित करणे, वैक्सीनची संपण्याची मुदत शिवाय जनजागृती या कालावधीला वर्ष उलटण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगतात. परिणामी, या लसीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागले हे मात्र निश्चित.
खासगी रुग्णालयात लस उपलब्ध; पण माेजावे लागतायेत तीन हजार रुपये !
संशाेधनातून असे दिसून आले की, एचपीव्ही लस गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर व इतर एचपीव्ही संबंधित कर्कराेग व इतर एचपीव्ही संबंधित कर्कराेगाचा धाेका कमी करते पण या लसीबाबात अद्याप सर्वसामान्य नागरिकामध्ये जनजागृतीच नसल्याने लस कुठे व कशी घ्यायची ? याबाबत सर्वसामान्य अनिभज्ञ आहेत. याशिवाय मुंबईतील बहुतांशी खासगी रुग्णालयात ही लस दिली जाते पण त्याकरीता तीन हजार रुपये माेजावे लागतात. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, राज्य सरकार मात्र या लसबाबत उदासीन असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे, डीजीसीआय, म्हणजेच भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने, पहिल्या मेड इन इंडिया म्यूएचपीव्ही लसीला अलीकडेच मंजुरी दिली आहे. सर्वात सामान्य आजारांमध्ये गणल्या जाणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून स्वतःचे संरक्षण करू शकत नसलेल्या महिलांसाठी ही सर्वात चांगली बातमी आहे तर सर्वाव्हॅक ही पहिली भारतीय गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस आहे ज्यामुळे प्रतिपिंड प्रतिसाद मिळतो जो बेसलाइनच्या तुलनेत किमान हजार पटीने अधिक मजबूत असल्याचे तज्ज्ञ डाॅक्टर सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होतो. यातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये होतात. महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशय मुख कर्करोग हा चौथ्या क्रमांकावर आहे. या कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे हा कर्करोग झाल्याचे पटकन लक्षात येत नाही. परिणामी अनेक महिलांसाठी हा धोकादायक ठरतो.
लक्षणे
योनीतून रक्तस्त्राव, लैंगिक संभोगदरम्यान वेदना, योनीतून स्त्राव, दुर्गंधीयुक्त पांढरा स्त्राव जाणे ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
प्रगत गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लक्षणे
भूक न लागणे, मळमळणे. वजन कमी होणे, थकवा येणे. ओटीपोटात दुखणे. पाठदुखी, पाय दुखणे, पाय सुजणे, योनिमार्गातून जड रक्तस्त्राव, हाडे फ्रॅक्चर आणि (क्वचितच),योनीतून मूत्र किंवा विष्ठा बाहेर पडणे.
डोचिंग केल्यानंतर किंवा ओटीपोटाच्या तपासणीनंतर रक्तस्त्राव होणे हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण आहे.
निदान लवकर झाल्यास उपचार करणे साेपे – तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास उपचार करणे सोपे आहे. मात्र जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा तो पुढील टप्प्यात गेलेला असतो. त्यामुळेच महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. अशी माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली आहे.
साेलारिस हॉस्पिटलचे स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. किरण शिंदे-ऐवळे म्हणाले,
ही लस ६ महिन्यांच्या अंतराने (० आणि ६ महिने) १५ वर्षापूर्वीच्या मुला-मुलींसाठी दाेन डाेसची शिफारस केली जाते. १५-४५ वर्षाच्या वयोगटात ०,२ आणि ६ महिन्यांच्या अंतराने तीन डाेस दिले जातात. ही लस दिर्घकाळ टिकणारी व ९२% प्रभावी आहे. ८० टक्के गर्भाशयाच्या मुखाचा कर्कराेग एचपीव्ही संसंर्गामुळे हाेताे. परिणामी, आम्ही मागील काही महिन्यांपासून मुंबई शहर, ठाणे जिल्हांमधील किशाेरवयीन महािवद्यालयीन विद्यार्थ्यांना मासिक पाळी आराेग्य व स्वच्छता पध्दती, लैंगिक शिक्षण व लसीकरणाबाबत माहिती देत जनजागृती करत आहाेत. या जनजागृतीला आम्हांला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांनी याबाबत माहिती व पुढाकार घेणे गरजेचे आहे.
ह्युमन पॅपिलाेमा व्हायरस हा १५० विषाणूंचा समूह
ह्युमन पॅपिलाेमा व्हायरस हा १५० विषाणूंचा समूह आहे, ज्यामुळे दरवर्षी ५० हजार पेक्षा जास्त कर्कराेग हाेतात. ८० टक्के गर्भाशयाच्या मुखाचा कर्कराेग एचपीव्ही संसर्गामुळे हाेताे. एफडीए मान्यताप्राप्त ही लस एचपीव्ही लस गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर व त्ततर एचपीव्ही संबंधित कॅन्सरचा धाेका लक्षणीयरित्या कमी करते, घसा, ताेंडाचे कर्कराेग आणि याेनी गुददवाराचे कर्कराेग राेखण्यास मदत हाेते.