
Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट
यावेळी आगामी १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये स्टॉल वाटपाची प्रक्रिया, स्टॉलधारकांना पावत्या दिल्या जातात किंवा नाही, समारंभाच्या दिवशी दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेचा हिशोब, दीक्षाभूमीच्या विकासासाठी विविध माध्यमांतून प्राप्त होणारा निधी व त्याचा विनियोग तसेच महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेल्या विकास निधीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील विकासाचे स्वरूप आदी मुद्द्यांचा समावेश होता. (फोटो सौजन्य – AI Created)
याशिवाय विद्यमान दीक्षाभूमी परिसर, वास्तू आणि विहाराबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावरही शिष्टमंडळाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या विषयांमुळे धम्म बांधवांमध्ये निर्माण होणारी अस्वस्थता आणि संभाव्य गैरसमज याकडे संस्थेचे लक्ष वेधण्यात आले.
शिष्टमंडळाने उपस्थित केलेले प्रश्न अध्यक्ष अरुण घोटेकर व पदाधिकाऱ्यांनी सविस्तर ऐकून घेतले. संबंधित विषयांवरील संस्थेची भूमिका, उपलब्ध माहिती तसेच दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भातील नियोजनाबाबत त्यांनी सकारात्मक व वस्तुनिष्ठ माहिती दिली. यामुळे संस्थेची भूमिका समजून घेण्यास शिष्टमंडळाला मदत झाली.
दीक्षाभूमी ही बौद्ध समाजाच्या श्रद्धा, इतिहास आणि अस्मितेशी जोडलेली महत्त्वपूर्ण वास्तू असल्याने तिच्या विकासाशी संबंधित सर्व बाबींमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे, अशी भूमिका शिष्टमंडळाने व्यक्त केली. तसेच अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती धम्म बांधवांपर्यंत पोहोचविण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली. दरम्यान, दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी आणि समाजासमोर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, यासाठी शहरातील प्रमुख बौद्ध बांधवाची व्यापक बैठक आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या बैठकीत संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करून धम्म बांधवांपर्यंत अधिकृत माहिती पोहोचविण्याबाबत पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे.
धम्म बांधवांचा संभ्रम दूर करण्यासाठी शहरातील प्रमुख बौद्ध बांधवांची व्यापक बैठक घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीत दीक्षाभूमीच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकृत व वस्तुनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याबाबत पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.