
Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
बस फलाटावर लागताच जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत असून, महिला आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल, कोरपना यासह जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसना मोठी गर्दी होत आहे. तसेच लगतच्या जिल्ह्यांकडे जाणाऱ्या एसटी बसेसमध्येही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी दिसून येत आहेत.
महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महामंडळाकडून काही जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असले तरी गर्दीच्या तुलनेत त्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. काही मार्गांवर प्रवाशांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बसमध्ये चढण्यासाठीही महिलांना मोठी कसरत करावी लागत असून, अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्याची वेळ आली आहे. गर्दीचा फायदा घेणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सणासुदीच्या काळात बसस्थानकावर होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन खिसेकापू किंवा चोरटे सक्रिय होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी रोख रक्कम, मोबाइल, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
रक्षाबंधनासाठी माहेरी जाण्याची खूप उत्सुकता आहे. मात्र बसस्थानकावर मोठी गर्दी असल्याने बस मिळण्यासाठी बराच वेळ थांबावे लागत आहे. महिलांसाठी आणखी जादा बसेस सोडल्या तर मोठी सोय होईल. – संध्या निंदेकर, चंद्रपूर, महिला प्रवासी
सुट्टयांमुळे गर्दी वाढणार हे प्रशासनाला माहित होते. त्यामुळे आधीच जादा बसेसची व्यवस्था करणे गरजेचे होते. सध्या बस येताच प्रवाशांची मोठी गर्दी होते. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांचे विशेष हाल होत आहेत. – उषा कोटरंगे, चंदपूर, प्रवासी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे नागपूर अमरावती, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यासाठी रक्षाबंधन निमित्त गाड्या सोडण्यात आल्या. २६ ते ३१ ऑगस्टपर्यंत उपक्रम राबविण्यात आला. प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला, त्या गाड्या सद्या सुरू आहेत. पण यातून किती रुपये उत्पन्न मिळाले हा आकडा अजून आलेला नाही. – अशोक कुमार वाडीभस्मे, विभाग नियंत्रक, चंद्रपूर.
एसटी बसेससोबतच चंद्रपूर रेल्वे स्थानक आणि खासगी वाहतूक केंद्रांवरही प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. सलग सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील प्रवाशांची संख्या वाढली आहे. रक्षाबंधनाचा उत्साह कायम ठेवत प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी एसटी महामंडळाने आणखी जादा फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.