
Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली; गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज
Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली आशा निर्माण केली होती. सुरुवातीचा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणीला सुरुवात केली. धान, सोयाबीन, कापूस यासह विविध पिकांची लागवड करण्यात आली. पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले, बी-बियाणे, खते, औषधांसह मशागतीचा खर्च केला. पावसाची साथ मिळेल आणि हंगाम चांगला जाईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आर्थिक जोखीम पत्करली. (फोटो सौजन्य – AI Created)
मात्र पेरणीनंतर पावसाने अचानक पाठ फिरवली, दिवसेंदिवस पावसाचा खंड वाढत गेला आणि उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत गेला. परिणामी शेतातील पीके पाण्याअभावी मरणासन्न अवस्थेत पोहोचली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक वाळताना दिसत आहे. मेहनत, खर्च आणि कर्ज घेऊन उभे केलेले पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
गोंडपिपरी तालुक्यात अनेक शेतकरी अल्पभूधारक आणि मध्यम भूधारक आहेत. शेतीतून मिळणारे उत्पन्नच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड यासाठी महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होतो. त्यामुळे यंदाचा दुष्काळ हा केवळ पिकांचा प्रश्न नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न बनला आहे. शासनाने गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
यंदा पावसाने पाठ फिरवली आणि उभे पिक आता डोळ्यादेखत उन्हाच्या दाहकतेने वाळून तालूका जात आहे. शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र शेतातील उत्पन्न लक्षात घेऊन आर्थिक मदत द्यावी. – अतुल झाडे, सधन शेतकरी, बोरगाव