वाई पालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील कारभारावर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराच्या कामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
Wai Municipal School: वाई नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १ ची कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली इमारत पूर्ण होऊन तब्बल तीन ते चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरी सुद्धा या इमारतीतील मूलभूत सुविधांची अवस्था पाहता नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उद्घाटनाच्या वेळी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त इमारत उभारल्याचा गाजावाजा करण्यात आला. पण प्रत्यक्षात लिफ्टसारख्या महत्त्वाच्या सुविधेच्या कामातच गंभीर त्रुटी असल्याचा आरोप होत आहे.
शाळेच्या इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्यात आली असली तरी लिफ्टच्या खाली आवश्यक बांधकाम व पीसीसीचे काम करण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही सुविधा केवळ नावापुरतीच राहिली आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, तर दुसरीकडे त्याच इमारतीतील आवश्यक कामे अपूर्ण अथवा निकृष्ट पद्धतीने राहात असतील तर पालिका प्रशासन नेमके कोणाच्या हिताची काळजी घेत आहे विद्यार्थ्यांची की ठेकेदारांची? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.विशेष म्हणजे इमारत पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटली असतानाही या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित प्रशासनाने ठोस पावले का उचलली नाहीत, याचे उत्तर आता नागरिकांना मिळणे गरजेचे आहे.
ठेकेदाराने काम पूर्ण केले की केवळ कागदोपत्री काम पूर्ण दाखविले? याचीही सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.गार्डनच्या नावानेही बोंबाबोंब शाळेच्या प्रांगणात गार्डनसाठी व्यवस्था असतानाही आजपर्यंत त्या परिसरात अपेक्षित फुलझाडे, हिरवळ किंवा सुशोभीकरण करण्यात आलेले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुंदर आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी करण्यात आलेली तरतूद प्रत्यक्षात कुठे वापरली गेली, याचाही हिशेब समोर येणे गरजेचे आहे.इमारत उभी राहिली; पण सुविधा कुठे असा सवाल पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे. विद्यमान नगरसेवकांचेही दुर्लक्ष या परिसराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान नगरसेवकांनी या गंभीर बाबीकडे आतापर्यंत लक्ष का दिले नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेच्या इमारतीत विद्यार्थ्यांचा रोजचा वावर असताना लिफ्टसारखी सुविधा अपूर्ण अवस्थेत असेल, तर त्याची पाहणी करून प्रशासनाकडे जाब विचारण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही का? असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.ठेकेदाराच्या कामाची ‘कसून’ चौकशी करा या संपूर्ण बांधकामाची तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक पातळीवर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कामाचा अंदाजपत्रक, मंजूर आराखडा, प्रत्यक्ष केलेले काम, वापरलेले साहित्य, मोजमाप पुस्तिका, देयके तसेच कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी.राजकीय हितसंबंध कोणाचेही असोत, ते बाजूला ठेवून चौकशी झाली पाहिजे. दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकारी व संबंधितांवर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारलेली शाळेची इमारत ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असते; ती ठेकेदाराच्या सोयीसाठी किंवा कागदोपत्री विकास दाखविण्यासाठी नसते. त्यामुळे वाई नगरपरिषद प्रशासन आता या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते, याकडे पालक, नागरिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.






