Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता
उरण तालुक्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक प्रकल्प आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी रानसई धरणावर आहे. उरण नगरपरिषद क्षेत्रासह एनएडी, ओएनजीसी आणि इतर औद्योगिक आस्थापनांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी झाल्यास त्याचा परिणाम घरगुती वापरासोबतच औद्योगिक क्षेत्रावरही होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
गेल्या वर्षी उरण तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने ११ डिसेंबरनंतर पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने महिनाभर अगोदरच पाणीकपातीची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे, नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे.
परतीचा पाऊस लांबल्याने रानसई धरणासह तालुक्यातील विहिरी, तलाव, बंधारे आणि अन्य जलस्रोतांवरही ताण वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने रानसई धरणाच्या पाणीसाठ्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे, मागील वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला होता. त्यानंतर परतीचा पाऊसही उशिरापर्यंत झाल्याने रानसई धरण तब्बल तीन वेळा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला होता. मात्र, यंदा पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरण क्षेत्रात परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये धरणाची पाणीपातळी ११६.६ फुटांपर्यंत होती. यंदा मात्र ही पातळी ११४.६ फुटांवर आली असून, त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर उपलब्ध पाणीसाठ्यावर मोठा ताण निर्माण होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच पाणीपुरवठ्यात कपात करण्याची वेळ येऊ शकते.
उरण तालुक्यातील शेतकरी सध्या परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भात पीक कापणीपूर्वीच्या महत्त्वाच्या अवस्थेत असून, अनेक ठिकाणी भाताच्या लोंब्या तयार झाल्या आहेत. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने भाताच्या दाणे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास भाताच्या दाण्यांची वाढ खुंटू शकते. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी भात पिकाची वाढ आणि पक्वतेची प्रक्रिया प्रभावित झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.
पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. गावनिहाय पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था करावी, तसेच पाणीवाटपाचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत्या काही दिवसांत पाऊस झाला तर परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. मात्र, पाऊस लांबला तर नोव्हेंबरपासून उरण तालुक्यात पाणीकपात लागू होण्याची शक्यता अधिक बळावणार आहे.






