
Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल
बिलात तेल, चणा, मीठ, बिस्कीट, सोप यांसोबत ‘चिकन सुपारी’ आणि ‘कात्रा सुपारी’ अशा वस्तूंची नोंद असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, ही खरेदी अंगणवाडीच्या पोषण आहारासाठी करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी अंगणवाडी सेविकेनेच संबंधित वस्तू मिळाल्या नसल्याचे स्पष्ट केल्याने या बिलाचा हिशोब नेमका कुठे जुळतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आता प्रश्नांची मालिकाच उभी राहिली आहे. जर खरेदी अंगणवाडीसाठी होती, तर संबंधित वस्तू अंगणवाडीपर्यंत पोहोचल्या का? आणि ग्रामपंचायतीसाठी खरेदी केली असेल, तर त्यासाठी ग्रामपंचायत बैठकीत ठराव झाला होता का? या दोन्ही प्रश्नांची कागदोपत्री उत्तरे अपेक्षित आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
बिलावर तारीख नसणे, काही ठिकाणी वजन व दराच्या नोंदी अपूर्ण असणे यामुळेही खरेदी प्रक्रियेची पडताळणी करण्याची मागणी होत आहे. मात्र, केवळ बिलातील नोंदीवरून गैरव्यवहार सिद्ध होत नसल्याने खरेदी आदेश, ठराव पुस्तिका, स्टॉक रजिस्टर, वितरण नोंदवही आणि संबंधित देयकांची तपासणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. खडसंगी ग्रामपंचायतीच्या कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ व युवकांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागील २४ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे.
ग्रामस्थांकडून आणखी काही संशयास्पद बिले तसेच कोऱ्या बिलांच्या आधारे रोख व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांची अधिकृत चौकशी होणे अद्याप बाकी आहे. आता २९ हजार ८०० रुपयांच्या या बिलातील वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी झाली का, त्या कुठे वापरण्यात आल्या आणि त्याला सक्षम मंजुरी होती का, याची कागदोपत्री पडताळणी झाल्यासच या ‘सुपारी’चे गूढ उलगडणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या हिशोबाच्या पारदर्शकतेकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मासिक सभेत कोणत्याही वस्तूंच्या खरेदीचा निर्णय झालेला नाही. मग ही खरेदी नेमकी कोणाच्या निर्णयाने करण्यात आली, हा प्रश्न आहे. त्यामुळे या बिलाशी मी पूर्णपणे असहमत आहे. – रुपचंद शास्त्रकार, ग्रामपंचायत सदस्य, खडसंगी
सदर खरेदी केलेल्या वस्तू आम्हाला प्रत्यक्षात मिळालेल्या नाहीत. अंगणवाडीसाठी दाखविण्यात आलेली कोणतीही सुपारी देखील आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे बिलामध्ये नमूद केलेल्या खरेदीबाबत आम्हाला माहिती नाही. – सुरेखा अथरगडे, अंगणवाडी सेविका, खडसंगी
सदर व्यवहार माझ्या कार्यकाळात झालेले नाहीत. त्यामुळे त्याबाबत मला कोणतीही माहिती नाहीं. सध्या माझ्याकडे ग्रामपंचायतीचा प्रभार आहे.- कवडू तरारे, ग्रामपंचायत अधिकारी, खडसंगी