
Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
चंद्रपूर शहरातील तब्बल २५ प्रभागांत सध्या एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून दररोज टँकरची गरज भासण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरुवातीला आठ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आता त्यात वाढ करून दहा टँकरद्वारे शहरातील नागरिकांची तहान भागविली जात आहे. महानगरपालिकेने २२५ कोटी रुपये खर्चुन अमृत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. त्यानंतरही अनेक भागांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. सध्या २७० कोटींच्या दुसऱ्या अमृत योजनेचे काम सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. शहरात अनेक ठिकाणी जलटाक्या उभारण्यात आल्या, पाइपलाइन टाकण्यात आली आणि नळजोडण्या देण्यात आल्या. मात्र पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रमाबाईनगर, वडगाव, सावरकरनगर, अपेक्षानगर, दादमहल वॉर्ड, बाबुपेठ, भिवापूर, गुलमोहर कॉलनी, लालपेठ कॉलरी, महसुल कॉलनी, राजीव गांधीनगर, परिवर्तन चौक, एकता चौक, श्यामनगर, इंदिरानगर, निर्माणनगर, अंचलेश्वर गेट परिसर, चोरखिडकी, नगीनाबाग, ओमभवन परिसर आणि राष्ट्रवादीनगर येथे एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या दरम्यान, ग्रामीण भागातील परिस्थितीही गंभीर बनली आहे. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ३४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर ५०० गावांतील नागरिक अवलंबून आहे.
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ५३९ गावांना पाणीटंचाईचा फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १६ कोटी ५५ लाख २० हजार रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला असून त्यात टँकर, विहीर अधिग्रहण आणि नवीन कुपनलिकोच्या नियोजनाचा समावेश आहे.
Abhay Chhajed Car Accident: काँग्रेस नेते अभय छाजेड यांच्या कारला भीषण अपघात
केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ घोषणेखाली राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशनची स्थितीही समाधानकारक नाही. जिल्ह्यातील १३०० कामांपैकी केवळ ७०० कामे पूर्ण झाली असून ६०० हून अधिक कामे अद्याप अपूर्ण आहे. २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेली अनेक कामे २०२६ मध्येही रखडलेली आहे. कोट्यवधी रुपये खर्चुनही नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.