
Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार
छाया उर्फ अरुणा राऊत या नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी व तुरीसाठी गेल्या होत्या. दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. सायंकाळी ६ वाजले तरीही त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. परिसरातील काही नागरिकांना घेऊन शेतात गेले असता, शेताजवळच रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती सिंदेवाही वनविभागाला तसेच पोलिसांना देण्यात आली.
घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. तपासणी करून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाने तातडीची २५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली आहे. हल्लेखोर वाघाची प्रतिमा टिपण्यासाठी वनविभागाने परिसरात कॅमेरे बसविले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे व गस्त वाढविण्यात आली आहे. यावेळी हल्लेखोर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी गुंजेवाही येथील ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४३ वा बळी आहे. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३९, बिबटे २, अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एक असे एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेती, पशुपालनासह अनेक व्यवसाय अडचणीत आलेले आहेत.
ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी परिसरात गत काही दिवसांपासून वाघाचा मुक्तसंचार सुरू असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २ दिवसांपूर्वी गावालगतच्या शिवारात वाघाने रानडुकराची शिकार केली होती. त्या मृत डुकराला खाण्यासाठी वाघ पुन्हा पुन्हा त्या परिसरात येत असल्याची माहिती समोर येत आहे. वनविभागाने तातडीने पथके रवाना करून वाघाला मानवी वस्तीकडून दूर उसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू केले. तरीही वाघाच्या वावरात विशेष घट न झाल्यामुळे रामपुरीसह आसपासच्या गावांतील नागरिक चिंतेत आहेत.
गुरे चराई करण्यासाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मूल तालुक्यातील कन्हाळगाव येथील कक्ष क्र. 1765 येथे घडली. पितांबर गुलाब सोयाम (37, रा. बेलघाटा) असे मृत गुराख्याचे नाव आहे. पितांबर हे शनिवारी दुपारच्या सुमारास गुरे चराईसाठी जंगलात घेऊन गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी परत आले नाही, यामुळे कुटुंबीयांनी गावात आणि परिसरात शोधाशोध केली. मात्र, कुठेही आढळून नाही. दरम्यान कुटुंबीयांनी वन विभागाला माहिती दिली.
रविवारी गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात जाऊन शोध मोहीम राबवली असता कन्हाळगाव विटातील कक्ष क्रमांक 1765 येथे वाघाच्या हल्ल्यात पितांबरचा नाहक जीव गेल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या पथकाने सदर घटनेचा पंचनामा करून मृत्तदेह उपजिल्हा रुग्णालय मूल येथे शवविच्छेदनाकरिता पाठविले. घटनास्थळाला सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी भेट देऊन कुटुंबीयांना तत्काळ ४० हजार रुपयाचे आर्थिक मदत केली आहे.
चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघसंख्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गत काही महिन्यांत मानव-वन्यजीव संघर्षाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढली असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण, योग्य भरपाई, प्रतिबंधात्मक उपाय योजना याबाबत शेतकरी सातत्याने मागणी करत असले तरी हल्ल्यांची मालिका थांबलेली नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गत ५ वर्षामध्ये मानव वन्यप्राणी संघर्षामध्ये २०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र हा संघर्ष रोखण्यात वनविभाग अपयशी ठरला असून अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.