Photo Credit- Social Media 'छत्रपती' कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर; कोण जिंकणार
अमोल तोरणे । नवराष्ट्र, बारामती: गेली दहा वर्ष रखडलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १८ मे रोजी होणार आहे. राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या ‘छत्रपती’ च्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकहाती वर्चस्वाला कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच छत्रपती कारखान्याच्या संचालक पदापासून झाली होती. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते.
पवार यांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेले पृथ्वीराज जाचक शरद पवार गटाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी उद्योजक श्रीनिवास पवार यांनी जाचक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा देखील केली होती. आगामी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ‘छत्रपती’ च्या निवडणुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून जाचक यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे जाहीर केले आहे. मागील निवडणुकांमध्ये जाचक यांनी अजित पवार यांच्या या कारखान्यातील एकहाती वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी निकराची झुंज दिली. मात्र पृथ्वीराज जाचक यांचा दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निभाव लागला नाही.
वीस वर्षापूर्वी पृथ्वीराज जाचक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये दुही नव्हती. कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा जाचक यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर छत्रपती कारखान्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू असताना अध्यक्षपदी आपणास संधी मिळावी, अशी जाचक यांची अपेक्षा होती. मात्र त्यावेळी अजित पवार यांनी जाचक यांना डावलून अध्यक्षपदी सध्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणी याची निवड करून सर्वांनाच पक्का दिला होता. जाचक यांच्याकडे राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील होती. मात्र अध्यक्ष पदासाठी डावलल्याने जाचक यांनी तडकाफडकी साखर संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर नाराज होऊन त्यांनी विरोधाची भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार याच्या विरोधातव भाजपकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली होती.
Kolhapur Hasan Mushrif – मुश्रीफांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून पुतळे उतरवून झाकून ठेवण्यात आले
यात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. सध्या राष्ट्रवादी कीयेसमध्ये दुफळी निर्माण होऊन दोन पक्ष झाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जाचक यांनी शरद पवार गटाला साथ दिली. या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सुनेत्रा पवार यांचे काम केले. सध्या ते शरद पवार गटासोबत सक्रिय आहेत. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जाचक यांच्या कार्यपद्धतीला मानणारा वर्ग कारखाना कार्यक्षेत्रात असला, तर तो मतामध्ये परावर्तित झाला नाही, मात्र सशरद पवार गटाची ताकद त्यांना मिळाल्यास सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस गटाला ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांना मानणारा वर्ग देखील छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांची असलेली शांत भूमिका पाहता ते या निवडणुकीत कोणाला साथ देणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
भरणेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक कारखान्याचे संचालक असलेले क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रामात्य देखील कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे. ‘छत्रपती’ ची निवडणूक भरणे याच्यासाठी देखील प्रतिष्ठेची ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री भरणे हे दोन नेते छत्वपतीच्या निवडणुकीसाठी ताकद पणाला लावणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मेोठ्या प्रमाणावर ऊस बाहेरील कारखान्यांनी पळवल्याने त्याचा मोठा फटका छत्रपती कारखान्याला बसला आहे, या पाश्र्वभूमीवर हा कारखाना अडकणीतून बाहेर काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यानी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सुज्ञ सभासदांचे म्हणणे आहे.
इच्छुकांची चाचपणी दरम्यान छत्रपती कारखान्याच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी पृथ्वीराज जाचक यांनी मोर्चे बांचणी सुरू केले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये इच्छुक उमेदवारांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. तर भारतीय जनता पक्षाचे नेते देखील तयारीला लागले आहेत. मात्र या निवडणुकीत भाजप महायुतीचा पर्म पाळून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला साथ देणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.