
धक्कादायक! जेवणात आढळली पाल, समाज कल्याणच्या वसतिगृहातील 28 विद्यार्थ्यांना
छत्रपती संभाजीनगरमधील किल्लेआर्क इथल्या समाज कल्याण वसतिगृहाच्या जेवणात गवारीच्या भाजीत पाल आढळली. यामुळे काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या झाल्या. त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करावे लागले. संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री ११.३० वाजेपर्यंत वसतिगृहासमोर धरणे आंदोलन केले. सहाय्यक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील समाज कल्याण विभागाच्या किल्लेआर्क येथील १००० मुलांच्या वसतिगृह युनिट क्रमांक १ च्या भोजनात काल सायंकाळी पाल आढळली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सायंकाळी साडेसातला जेवण करताना गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये पाल आढळली. मुलांनी एकच आरडाओरडा केला काहीजणांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने आम्हाला मेस चालकाने घाटीत दाखल केले. त्यानंतर, संध्याकाळी ७:३० च्या सुमारास विद्यार्थ्यांनी वसतिगृहासमोर आंदोलन सुरू केले. समाज कल्याण सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी असुविधांचा पाढा वाचला. मेस चालक योगिराज गोरशेटे यांनी चूक मान्य करीत माफी मागितली; तसेच पुन्हा असा प्रकार होणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, त्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, जवळपास ४० ते ५० मुलांनी ते जेवण केले होते आणि त्यापैकी बहुतेकांना पोटदुखी आणि डोळे लाल होण्यासारखा त्रास होत आहे. वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामध्ये कच्च्या पोळ्या, पाण्यात दूध पावडर मिसळून दिलेले दूध आणि खराब अंडी व फळे यांचा समावेश आहे. ‘सर्व मेस बंद करून विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पैसे टाकण्यात द्यावा’, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वीही जेवणात अळ्या निघाल्याच्या तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने लक्ष न दिल्यास समाजकल्याण कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.