फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी बस प्रवासादरम्यान भेडसावणाऱ्या समस्यांची गंभीर दखल घेत, परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळ लवकरच विशेष हेल्पलाइन सुरू करणार असून, शालेय बस फेऱ्यांचे योग्य नियोजन न करणाऱ्या आगार व्यवस्थापकांवर कठोर कारवाई करण्याची तयारीही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दर्शवली आहे. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला दिलेल्या भेटीत त्यांनी ही माहिती दिली.
या भेटीदरम्यान अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष मंत्र्यांसमोर शालेय बस व्यवस्थापनातील विविध त्रुटी मांडल्या. काही विद्यार्थ्यांनी एसटी बस वेळेवर सुटत नसल्याची तक्रार केली, तर अनेकांनी बसमध्ये गर्दी वाढल्यामुळे चालक-वाहक थांब्यावर थांबत नसल्याचा आरोप केला. बस उशिरा येणे, अचानक रद्द होणे आणि त्यातून निर्माण होणारे शैक्षणिक नुकसान यावरही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. काही ग्रामीण आणि आदिवासी भागांत विद्यार्थ्यांसाठीच असलेली ‘मानव विकास बस’ इतर कारणांसाठी वापरली जात असल्याचेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले, ज्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांनाच प्रवासाची गैरसोय होते.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की शाळा किंवा महाविद्यालय सुटल्यानंतर एका तासाच्या आत घरी पोहोचणे अपेक्षित असते. मात्र बस सेवेत होत असलेल्या अडचणींमुळे घरी जाण्यास प्रचंड विलंब होतो. यामुळे पालकांचा ओरडा सहन करावा लागतो आणि काही वेळा गैरसमजातून विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षा देखील मिळते. अशाच वाढत्या ताणतणावामुळे काही विद्यार्थिनींनी आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय घेतल्याच्या घटना समोर आल्या असून, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
शालेय वेळेत विद्यार्थ्यांना बस सेवा वेळेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित आगारांवर आहे. त्यामुळे त्यात झालेल्या त्रुटींसाठी थेट आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक अधिकारी जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे जितके दिवस नुकसान झाले आहे, त्या प्रत्येक दिवसाची स्वतंत्र नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा सक्तीची रजा देण्यापर्यंतची कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शालेय बस सेवेत सुधारणा करण्याची गरज अधिक तातडीची बनली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि तात्काळ मदतीसाठी एसटी महामंडळ लवकरच विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करणार आहे. राज्यातील सर्व ३१ विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याने, प्राचार्यांनी किंवा मुख्याध्यापकांनी या क्रमांकावर थेट संपर्क साधून तक्रार नोंदवता येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना तत्काळ मदत मिळावी आणि बससेवा अधिक जबाबदारीने चालवली जावी, यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आणि सोयीला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी सेवा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.






