BMC Election: मुंबईत 11 लाख दुबार मतदार, यादीतही मोठा घोळ, निवडणूक आयोगाची कबुली
विशेष म्हणजे, एका व्यक्तीचे नाव तब्बल 103 वेळा मतदारयादीत असल्याचा धक्कादायक खुलासा महापालिकेने केलाआहे. शहरात 4 लाख 33 हजार नागरिकांची नावे एकापेक्षा अधिक वेळा मतदारयादीत नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेला दुबार मतदारांचा आरोप खरा ठरल्याची चर्चा आता मुंबईसह राज्यभराती सुरू झाली आहे.
मुंबईत दुबार मतदारांची संख्या चिंताजनकरीत्या वाढली आहे. निवडणूक यादीत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदली गेली असून त्यामुळे शहरातील दुबार मतदारांचे एकूण प्रमाण सुमारे 11 लाखांवर पोहोचले आहे. डुप्लीकेट मतदाराचे नाव नेमके किती वेळा नोंदवले गेले आहे, याबाबत प्रशासनाकडे स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हे गैरप्रकार तातडीने दुरुस्त करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने (BMC) विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दुबार नावे हटवण्यासाठीची ही मोहीम शहरभर चालवली जाणार आहे. 24 वॉर्डांमधील निवडणूक कार्यालयांमार्फत सहाय्यक आयुक्त ही प्रक्रिया प्रत्यक्षात राबवणार असून, मतदारयादीतील त्रुटी तातडीने दूर करण्यावर भर दिला जाईल.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनात गंभीर त्रुटी आणि गोंधळ कायम असल्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. मतदारयादीतील चुका तातडीने दुरुस्त करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर निशाणा साधत दोन्ही नेत्यांनी पत्रात म्हटले होते की, “मतदारयादीतील गोंधळ कायम ठेवण्याची आणि तो कधीही न सुटता अधिक गुंतागुंतीचा होत जाण्याची जी सातत्यपूर्ण प्रवृत्ती निवडणूक आयोगाने दाखवली आहे, त्याबद्दल अभिनंदन करावे की खेद व्यक्त करावा, हेच समजत नाही. पण एक गोष्ट मात्र पुन्हा स्पष्ट झाली—मतदारयादीतील घोळ जसाच्या तसा ठेवण्यात आला आहे.”






