
Chatrapati Sambhajinagar मध्ये सतीश चव्हाण ठरले 'धुरंधर'
दरम्यान नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात ७४ पैकी ३८ नगसेवक निवडून आणले. तसेच गंगापूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष आणि ११ उमेदवार निवडूण आणत आमदार प्रशांत बंब यांना देखील धक्का दिला आहे. आमदार चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी आमदार चव्हाण हे ‘धुरंधर’ ठरले आहेत.
गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय जाधव २२५२ मतांनी विजयी झाले. जिल्ह्यातील एकूण १६० नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीने ७४ उमेदवार उभे केले होते. यामध्ये गंगापूर नगर परिषदेत २० पैकी ११, खुलताबादमध्ये २० पैकी ९, कन्नडमध्ये २० पैकी १२, वैजापूरमध्ये ९ पैकी ४, पैठणमध्ये २ पैकी २ अशा एकूण ३८ जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. गंगापूरच्या होमग्राऊंडवर प्रशांत बंब यांचा पराभव हा देखील वैशिष्ट्यपूर्ण मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांच्यासमोर निसटत्या फरकाने बंब विजयी झाले होते.
कन्नड व खुलताबादमध्ये नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले नसले तरी कन्नडमध्ये सर्वाधिक १२ तर खुलताबादमध्ये सर्वाधिक ९ उमेदवार उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आमदार चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करुन विधानसभा लढविली होती. मात्र विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी लगेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी केली. त्यानंतर अजित पवार यांनी चव्हाण यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबबदारी सोपविली होती. ही जबाबदारी चव्हाण यांनी सार्थ ठरविली असल्याचे निवडणुक निकालावरुन स्पष्ट झाले आहे.