फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला होता. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे घटना घडल्यापासून फरार होता. आता या जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. कल्याणला त्यांच्या आई व बायकोला भेटायला आलेल्या जयदीपला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली. यानंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. हा शिल्पकार काही राजकारण्यांचा जवळ असल्यामुळे तो आता हाती लागणार नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. पोलीसांच्या अथक प्रत्यनानंतर अखेर काल (दि.04) शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी पथक तयार करत आपटेचा शोध सुरु ठेवला होता. कल्याणमध्ये जयदीप आपटे त्याच्या आई व बायकोला भेटायला आला. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयदीप आपटे याच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये कोणाला क्षमा नाही. कोणालाही आम्ही सोडणार नाही. आम्ही आधीच सांगितलं की त्याच्यावर कारवाई होईल. या प्रकरण विरोधक जे काही अफवा पसरवत होते त्यांनाही मोठी चपराक आम्ही दिली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, आमचं सर्वांना सांगणं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये श्रद्धा आहे. राजकोटमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. पण यावरुन राजकारण करणं हे त्याहूनही मोठे दुर्दैव आहे. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी रुबाबामध्ये उभा करणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊतांना विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ
त्याचबरोबर विरोधकांनी शिल्पकार जयदीप आपटे या अटक होत नसल्यामुळे टीकेची झोड उठवली होती. खासदार संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. हा व्यक्ती कधीच सापडणार नाही, असा दावा देखील विरोधकांनी केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संजय राऊतांना तर ठाण्यातल्या एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे. बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा दिल्लीतले लोक मातोश्रीवर यायचे आता यांना दिल्लीत जावं लागतं आहे. दिल्लीत जाऊन मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगावं लागतं आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्यावर अशी परिस्थिती होते. आम्ही विकासावर भर दिलाय, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.