
केतनच्या वडिलांच्या आक्रोशापुढे मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय (Photo Credit- X)
केतन अग्रवाल याच्या अनपेक्षित आणि क्रूर हत्येमुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज पुण्यात केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी आर्त हाक दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी अग्रवाल कुटुंबाचे सांत्वन करत मोठे आश्वासन दिले. “या प्रकरणातील दोषींना कठोर आणि फाशीसारखी कडक शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अग्रवाल कुटुंबाला न्याय देण्यासाठी तपास यंत्रणा कोणतीही कसूर ठेवणार नाही.” यावेळी विशाल अग्रवाल यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि सरकारतर्फे ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत विधी व न्याय विभागाच्या सचिवांना निर्देश दिले आहेत.
लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी… pic.twitter.com/JGAsQVCOvd — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2026
पोलीस कोठडीत असताना आरोपी प्रेयसी सिया गोयल हिने गुन्ह्याची धक्कादायक कबुली दिली आहे. तिने पोलिसांना सांगितले की, लग्न ठरल्यानंतर तिला केतनला टक्कल असल्याचे समजले. तो लोकांमध्ये वावरताना केसांचा विग (Hair Wig) वापरायचा. सियाला टक्कल असलेल्या पुरुषासोबत आयुष्य काढायचे नव्हते. मात्र, कुटुंबियांचा लग्नासाठी दबाव असल्याने आणि घरचे लग्न मोडण्यास तयार नसल्याने ती हताश झाली होती. यातूनच तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनचा काटा काढण्याचे ठरवले. तिने ट्रेकिंगच्या बहाण्याने केतनला लोहगडावर बोलावले आणि तिथे चेतनच्या मदतीने त्याला दरीत ढकलून दिले. सध्या दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
हत्येच्या घटनेनंतर सियाचे कुटुंब प्रचंड धक्क्यात आहे आणि सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे तणावाखाली आहे. तिचा प्रियकर चेतन याचे वडील प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्यात येत असले, तरी सियाचे आई-वडील किंवा तिचा भाऊ तिला भेटायला आलेले नाहीत. आता पोलिसांनी सियाच्या भावाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले आहे. केतन अग्रवाल टक्कल असल्याबद्दल सियाने कधी आक्षेप घेतला होता का किंवा त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, या कटाची पूर्वकल्पना कुटुंबातील अन्य कोणाला तरी असू शकते, या शक्यतेचीही तपास अधिकारी पडताळणी करत आहेत.