सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड/ संभाजी महामुनी : दिवे घाटात गुरुवारी (दि. २४) रात्री भर रस्त्यावर मोठे दगड आणि काही प्रमाणात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शनिवारी (दि. २६) पहाटे पुन्हा दुधाचा टँकर पीएमपीएमएल बसवर आदळून कित्येक प्रवासी जखमी झाले. यामध्ये बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सलग दोन दिवसांत दोन घटना घडल्याने दिवे घाटातील वाहतूक सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात दिवे घाटातील दरड कोसळू नये यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
साहित्यिक शब्दात दिवे घाटाचे वर्णन सुंदर केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांची वारी याच घाटातून जाते, याच घाटाच्या पायथ्यालगत ऐतिहासिक मस्तानी तलाव आहे. नागमोडी वळणाचा आणि हिरवाईने नटलेला दिवेघाट पाहण्यासाठी दररोज हजारो नागरिक येथे गर्दी करतात. मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे दिवे घाटातील प्रवास सुखकर आहे का? याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. दिवे घाटातील अपघात रोखणे, घाटातून कोसळणारे मोठाले दगड बाजूला करून टाकणे अशा सूचना प्रशासनाला वारंवार दिलेल्या असताना प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आले आहे. त्यामुळे दिवे घाटात मोठी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय? अशा शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हे सुद्धा वाचा : कात्रज घाटात भीषण अपघात; टेम्पोची दुचाकीला धडक बसली अन्…
पालखी सोहळा प्रमुखही वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत अनभिज्ञ
दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा तोंडावर आला की, तालुका आणि जिल्हा प्रशासन तसेच पालखी सोहळ्याचे विश्वस्त पालखी मार्गाची पाहणी करतात. पालखी मार्गाची पाहणी करताना वास्तविक पाहता दिवे घाटाच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक असताना केवळ पालखी मुक्काम आणि विसावा ठिकाणांची पाहणी होते. दिवे घाटात दरड कोसळण्याची शक्यता असून संपूर्ण घाटात डोंगराच्या बाजूने जाळी बसविणे, ज्या भागातील दगड कोसळण्याची शक्यता आहे तेथील दगड बाजूला हटवून रस्ता सुरक्षित करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत प्रशासनाने फारसा गांभीर्याने कधी विचार केलाच नाही. एवढेच काय पण पालखी सोहळा प्रमुखही वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत अनभिज्ञ राहिले आहेत.
अपघातांच्या प्रमाणात वाढ
दिवे घाटात संत नामदेव महाराज यांच्या वंशजांचा काही वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. अनेक एसटी बस, दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात कित्येकवेळा घडले आहेत. रस्त्यात बस बंड पडणे, बस जळून खाक होणे अशा घटनाही कित्येक घडल्या आहेत. घाटामध्ये कचरा टाकणे ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र पालखी सोहळा वगळता इतर वेळी घाटातील स्वच्छतेकडे प्रशासन गांभीर्याने फारसे घेत नाही. सायंकाळच्या वेळी घाटात दरड कोसळल्याने नागरिकांना आणि पोलीस प्रशासनाला काही उपाययोजना करता आल्या. मात्र रात्रीच्या वेळी अशी घटना घडली किंवा अत्यंत रहदारीच्या काळात प्रकार घडून काही घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
रुंदीकरणाचे काम कधी सुरु होणार?
दिवे घाटातील वन खात्याच्या परवानग्या मिळून रस्त्याच्या रुंदीकरणाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात कधी होणार? दिवे घाटातील काम सुरु करताना सासवडकडे येणारी सर्व वाहतूक कात्रज, बोपदेव घाट मार्गे पुरंदरला वळवावी लागणार आहे. मात्र बोपदेव घाटाची अवस्था त्यापेक्षा दयनीय आहे. घाटातील धोकादायक वळणे, अरुंद घाट यामुळे तिथेही वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे प्रथम बोपदेव घाटाचे काम केल्यानंतर दिवे घाटाचे काम करणे उचित ठरेल. मात्र एकदम दिवे घाटाचे काम सुरु करून वाहतूक बंद केल्यास बोपदेव घाटात मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.