फोटो सौजन्य: @CMOMaharashtra (X.com)
पुणे शहरात वाहतूक कोंडी ही खूप मोठी समस्या बनली आहे. म्हणूनच तर पुणे शहरातील ट्रान्सपोर्ट गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा, असा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
पुणे शहरातील ट्रान्सपोर्टच्या गतिमानतेसाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिला. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा, तसेच यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. याव्यतिरिक्त, पुणे शहरातील विविध विकासात्मक योजना हाती घेण्यात आल्या, ज्या पुण्यासोबत नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या शहरांसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरतील.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे आणि नाशिकसाठी नव्या रस्ते जाळ्यांचा प्रस्ताव दिला. यामध्ये 636.84 कोटी रुपयांच्या निधीचा समावेश पुरंदर विमानतळासाठी रस्ते तयार करण्यासोबतच रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी 203 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ‘अर्बन ग्रोथ सेंटर’ साठी 1526 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुणे सातारा आणि पुणे नगर रस्त्यापासून पुरंदर विमानतळाची कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहर नियोजनात भविष्यातील लोकसंख्येचा विचार करत रस्ते 18 मीटर रुंदीचे ठेवण्याची सूचना केली. यामुळे भविष्यातील वाढलेल्या लोकसंख्येची आवश्यकता पूर्ण होईल. पाणीपुरवठा योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, आणि प्राधिकरणांनी ऑनलाईन सेवा सुधारून नागरिकांना सुलभता प्रदान करावी. विकास शुल्कांची रचना परवडणारी असावी, अशीही सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
प्राधिकरणांनी दोन टप्प्यात विकास योजना तयार कराव्यात. पहिल्या टप्प्यात रस्ते, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, विज पुरवठा यांचा समावेश असावा. दुसऱ्या टप्प्यात इतर सुविधांचा समावेश करण्यात यावा. याबरोबरच, प्राधिकरणांनी पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी 500 सीएनजी बसेस मागवण्याचे निर्देश दिले. यामुळे नागरिकांना कमी खर्चात वातानुकूलित प्रवास मिळेल. तसेच, पुणे मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी राजभवन आवारातील जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि नागपूर महानगर प्राधिकरणांनी शहरांच्या विकासासाठी विविध योजनांची रचना केली आहे. यामध्ये औद्योगिक क्षेत्रे आणि पर्यटन स्थळांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी रस्ते तयार करणे, तसेच कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास योजना तयार करणे यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक जरी झाली, तरी या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ सल्लागार एजन्सींचा वापर आणि तंत्रज्ञानाचा सर्वांत आधुनिक वापर अनिवार्य ठरेल.