पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) नामांतर संदर्भात मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) शिष्टमंडळासह बैठक घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेचा आदर करत दि.बा.पाटील (D.B.Patil) यांच्या नावाला पाठिंबा (Support) दर्शवला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून सध्या वाद सुरू आहे. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांनी आग्रह धरला आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांची एक समिती कार्यरत असून या माध्यमातून अनेकदा आंदोलने करण्यात आली. तर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचीही मागणी होत आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे मुंबई विमानतळाचे एक्स्टेन्शन असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव योग्य ठरेल, असे म्हटले होते. त्यावरून आता संघर्ष सुरू होता. मात्र, समितीच्या वतीने आग्रह धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, ते सकारात्मक असल्याची माहिती आमदार बाळाराम पाटील (MLA Balaram Patil) यांनी दिली.
पनवेल उरण महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या भावना समजावून सांगत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा विचार करत विमानतळाला लोकनेते दि.बा पाटलांचे नाव असेल असे जाहीर केले.
मी नाही तर एकनाथ शिंदे यांचा बाळासहेबांच्या नावाला आग्रह होता असेही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाची लाट पसरली असली जोपर्यंत शासन सिडकोत ठराव करत नाही तोपर्यंत प्रकल्प ग्रस्तांकडून सावध पावित्रा घेतला जात आहे.
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा पाटील यांचे नाव द्यावे अशी भूमिका विमानतळाची घोषणा झाल्यापासून ठाणे, नवी मुंबई, पनवेल उरण मधील भूमिपुत्रांनी घेतलेली आहे. त्याबाबतची अनेक पत्रे सिडकोकडे दिली गेली आहेत.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर सिडकोने संचालक बैठकीत विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे विमानतळ असे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. ही बाब उघड होताच भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या विरोधात २०२१ सलापासून भूमिपुत्र विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. तर विमानतळ कृती समितीकडून मुख्यमंत्र्यांच्या अनेक भेटी देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास आग्रही होते.
अगदी फेसबुक लाईव्हद्वारे देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या या निर्णयाचा पुनरूच्चार केला होता. मात्र प्रकल्पग्रस्तांनी आपला लढा कायम ठेवत दि. बांच्या नावासाठी प्रसंगी प्रण देण्याची तयारी देखील केली होती. मात्र सध्या राज्याचे राजकारण फिरल्याने त्याचे पडसाद सर्वच बाबतीत पाहण्यास मिळत आहेत.
मुंबई वगळता इतर एम आर क्षेत्रात शिंदे गटाचे असलेले वजन व या क्षेत्रात वासलेला भूमीपुत्र या सर्व बाबी लक्षात घेत आगामी स्थानिक स्वराज्य समस्थांनमध्ये शिंदे गटामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी सध्या तरी दि. बा यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यास होकार दिला आहे.
याप्रसंगी पनवेल उरण महा विकास आघाडीचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, सुदाम पाटील, अभिजीत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत आदींसह महाविकास आघाडीचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.