कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार; असा होईल पाणीपुरवठा (फोटो सौजन्य-X)
kalyan News : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावं आणि २७ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवनियुक्त आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज एमआयडीसी विभागाचे सीईओ व सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली. या बैठकीत १४ गावं आणि २७ गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे.
गोवर्धन मोरे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न १४ गावं आणि २७ गावांना पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
तर दुसरीकडे कल्याण पूर्व परिसरातील खडगोलवलीसह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासले आहे. पाणीटंचाई बाबत नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली मात्र पाणी समस्या जैसे थे आहे. अखेर शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. यावेळी पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याच्या दाबा बाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. तसेच कल्याण पूर्व येथील बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे टाकायचे कामही 90 टक्के पूर्ण झाले आहे. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर कल्याण पूर्वेतील पाणी समस्या निकाली निघेल असं आश्वासन दिले.
त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील मानकुळे, बहिरीचापाडा, नारंगीचा टेप, बंगला बंदर, गणेशपट्टी ही खाडी किनारी असल्यामुळे येथील असंख्य नागरित मोलमजुरी करुन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. सुमारे साडेतीन हजार लोकवस्ती असलेल्या या गावांमधील नागरिकांना एमआयडीसीद्वारे पाणी देण्यासाठी तीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या काही महिन्यांपासून लाखो रुपये किमतीचे जलजीवन योजनेचे काम सुरु केले. पाईप टाकण्यात आले. परंतु, अजूनपर्यंत पाण्याचा थेंबही या गावांतील नागरिकांना मिळालेला नाही. पाण्याचा एक हंडा मिळविण्यासाठी एक तास प्रतिक्षा करावी लागत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे. पाण्यासाठी रात्र जागून घालवावी लागत असल्याने महिलावर्गामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.