कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक; 'या' बड्या नेत्याने केली राजीनाम्याची मागणी
मुंबई : राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेचं आक्रमक झाले आहेत. अशातचं आता काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी जोरदार निशाणा साधत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
“हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला”, या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर अतुल लोंढे यांनी तीव्र आक्षेप घेत माणिकराव कोकाटे व भाजपा युती सरकारवर तोफ डागली. शेतकरी अन्नदाता आहे, देशाचा मालक आहे, तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते, स्वतः उपाशी राहून तो लोकांचे पोट भरतो त्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत कशी होते? पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे पण भ्रष्टाचार होतच असतात असेही कृषी मंत्री कोकाटे म्हणत आहेत. सरकारमधील लोकांना काही लाजलज्जा आहे का? कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत? असा सावल विचारत अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असे अतुल लोंढे म्हणाले.
हे सुद्धा वाचा : कराड हादरलं! प्रेमप्रकरणातून महिलेवर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…
माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य काय?
हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, काही लोकांनी त्याचा गैरवापर केला. ही योजना यशस्वी व्हावी व त्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. पीकविमा योजनेविषयी सरकारच्या गाठिशी चांगले – वाईट अनुभव आहेत. पण ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या त्यांच्या या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने येथील कृषी विकास परिषद व प्रदर्शनीचे उद्घाटन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. तत्पुर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पीक विमा घोटाळ्याविषयी संताप व्यक्त केला.