एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले? मराठा आरक्षणावरुन काँग्रेसचा सवाल
नांदेड : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील हे लाखो मराठा समर्थकांसह मुंबईमकडे निघाले आहेत. यामुळे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे असे सत्ताधारी नेत्यांकडून विचारले जात आहे. अशातच आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रीया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाचा मिळावे असा कायदा महाराष्ट्र विधिमंडळात एकमुखाने झालेला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती तर आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मराठा समाजाला मीच आरक्षण देऊ शकतो अशी वल्गणा केली होती, त्याचे काय झाले असा प्रश्न विचारून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे जाती पातीच्या व धर्माच्या पलीकडे जाऊन बघितले पाहिजे असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली. स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे बहुजन समाजातील सर्वसमावेश नेतृत्व होते. मराठवाडा तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासात दोघांचे व चव्हाण कुटुंबियांचे अनन्यसाधारण योगदान आहे. या भागात त्यांनी केलेले कार्य दिर्घकाळ लक्षात राहणारे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सपकाळ पुढे म्हणाले की, बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा म्हणजे पांग फेडण्याचा कार्यक्रम आहे. वेगळवेगळे पक्ष, धर्म, जात असली तरी सर्वांना सोबत घेऊन जावे हे आपले संस्कार आहेत. पण आज राज्यात अत्यंत खालच्या पातळीवर बोलले जाते, जात व धर्माच्या नावावर काय चालले आहे त्यावर तर बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे परंतु या पावन भूमितील समाज जर जातीपातीत विभागला जात असेल, किराणा माल घेतानाही जात बघितली जात असेल तर कुठे नेऊन ठेवला आहे मराठवाडा माझा, असे विचारावे वाटते. पुढील काळात सद्भावना व सद्भावनाच जोपासा व विषारी वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.