फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पूजा खेडकर हे नाव गाजत आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांची चर्चा राज्यात नाही तर देशभरामध्ये सुरु आहे. त्याचबरोबर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या देखील वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्या आहेत. शेतकऱ्यांवर पिस्तुल रोखल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या. दमदाटी करणाऱ्या मनोरमा खेडकर यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. मात्र अटक केल्यानंतर देखील खेडकर यांचा तोरा काही कमी होत नाही. तुरुंगामध्ये देखील त्यांच्या तक्रारी सुरुच असून पोलिसांविरोधात त्यांची आरोपांची सरबत्ती सुरु आहे.
पौड पोलिसांनी वादग्रस्त पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक केली होती. मुळशी तालुक्यातील धडवली येथील शेतकऱ्यांवर पिस्तुल रोखत दमदाटी करत असल्याचे समोर आले होते. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनोरमा यांना अटक करण्यात आली आहे. 20 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन दिवस मनोरमा खेडकर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र अटक करुन देखील मनोरमा खेडकर यांना ताठा कायम हे. पोलीसांवर आरोप, तुरुंगातील असुविधांची यादी आणि तक्रारींचा सूर असे कारनामे आता मनोरमा यांचे तुरुंगामध्ये सुरु आहेत.
जेवण चविष्ट अन् वेळेवर नाही
मनोरमा खेडकर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे. मात्र तुरुंगामध्ये त्यांच्या पोलिसांविरोधात तक्रारींचा पाढा सुरु आहे. पोलिसांवर त्यांनी एकामागून एक आरोप केले असून सुविधा नसल्याविषयी थेट कोर्टासमोर माहिती दिली. कोठडीतील जेवण बेचव असल्याचा आरोप मनोरमा खेडकर यांनी केला आहे. जेवण बेचव असल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. तसेच जेवण वेळेवर देखील मिळत नाही अशी देखील मनोरमा खेडकर यांची तक्रार आहे. तसेच तुरुंगात चहा सकाळी 9 वाजता देण्यात आला. जेवण दुपारी दीड वाजता देण्यात आले. कोठडीतील जागा ओली असल्याचा आरोप देखील मनोरमा खेडकर यांनी केला आहे. बाहेर कारनामे करणाऱ्या खेडकर यांचे तुरुंगामध्ये देखील नखरे सुरु आहेत. त्यांच्या आरोपांची कोर्टाने दखल घेतली असून कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाकडून मागवण्यात आले आहे. तसेच जेवण वेळेवर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र मनोरमान खेडकर यांना जामीन देण्यात न्यायालयाने नकार दिला आहे.