मुंबई, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी दोन दिवसांच्या मुंबईभेटीच्या (Mumbai Visit) दुस-या दिवसाच्या सुरूवातीलाच महाराष्ट्र मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात “महाराष्ट्राच्या सर्व जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!”
असा चक्क मराठीत संवाद सुरू केला. त्यावेळी सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पत्रकारांशी आणि उपस्थितांशी मराठीतून संवादांची सुरूवात करत दिदीनी त्यांची मने जिंकली. यावेळी सभागृहात जावेद अख्तर आणि स्वरा भास्कर उपस्थित होते. यावेळी ममता बॅनर्जी यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली.
तृणमुल कॉंग्रेसचा राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर ममता बनर्जी यानी तृणमुल कॉंग्रेसचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा कार्यक्रम आखला आहे, त्याची सुरूवात करत त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. मुंबईत त्यांच्या दोन दिवसांच्या भेटी दरम्यान सांस्कृतिक, राजकीय तसेच उद्योग आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम होता. मुंबई दौऱ्यावर पोहोचताच काल ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यानी शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला.
काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची एकजूट अशक्य
दरम्यान, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तृणमूल केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहणार नाही, असा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांत दिला आहे.
महाराष्ट्रही सरकारी दहशतवाद्यांशी सामना करेल
दरम्यान ममतांसोबत नेमकी काय चर्चा करण्यात आली? याची माहिती खा राऊतांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले की यावेळी राजकीय चर्चा सोबतच भाजपकडून तपास यंत्रणांचा होणारा गैरवापर या विषयावर अधिक चर्चा झाली. शासकीय दौऱ्यावर असल्या तरी मुंबईत आल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा होती. मात्र, आजारपणामुळे त्यांना कोणीही भेटू शकत नाही. त्यामुळे ममता दीदींनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते तपास यंत्रणांचा दबाव टाकून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचे महान कार्य पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत, असे ममता दीदींनी सांगितले. तसेच महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारी दहशतवाद्यांशी सामना करेल याची खात्री आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्याचे संजय राऊतांनी सांगितले.